Friday , June 26 2026
Breaking News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज : एक आदर्श व्यक्तिमत्व

Spread the love

 

– डॉ. चंद्रकांत वाघमारे, बेळगाव
कोल्हापूरचे महाराज, दीनदलित, आदिवासी, कष्टकरी- रयतचे लोककल्याणकारी राजे छत्रपती शाहू महाराज यांची आज 26 जून ही जयंती भारतभर साजरी होत आहे, त्यानिमित्त…. गोरगरीब जनतेच्या हिताचा कारभार कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा कार्यकाळ आपण बघू शकतो.
आपल्या राज्यकारभारात त्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, जलसिंचन, क्रिडा, कला अशा विविध क्षेत्राबाबत निर्णय घेऊन एक वेगळा आधुनिक समाज घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी झाला आणि मृत्यु ६ मे १९२२ रोजी झाला. महाराजांनी १८९४ ते १९२२ पर्यंत २८ वर्षे करवीर राज्यांचा राज्यकारभार केला.
त्यांच्या कार्याचा थोडक्यात आपण उल्लेख आपण करूया.
सामाजिक क्षेत्रात अनेक बदल घडवणे त्या काळात गरजेचे होते त्या दृष्टीकोनातुन छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले, त्यातुन शिक्षणाची गंगा करवीर मध्ये वाहु लागली. तसेच, महाराजांनी आपल्या राज्यात ५० टक्के आरक्षण जाहिर करून बहुजन समाजाला नोकर्यांची संधी दिली.
आज भारतात आरक्षणाचे जनक छत्रपती शाहु महाराजांना म्हटले जाते.
करवीर राज्यामध्ये शेतीच्या विकासासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न गरजेचे आहेत हि बाब ओळखून छत्रपती शाहू महाराजांनी तत्कालीन भारतातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प राधानगरी येथे राबवला. हेच राधानगरी धरण-महाराणी लक्ष्मीबाई तलाव आज संपुर्ण कोल्हापुरकरांसाठी वरदान ठरत आहे यावरून महाराजांची दुरदृष्टी आपल्या लक्षात येते.
तसेच,महाराजांनी शेतीत विविध पिकांची लागवड करून अनेक प्रयोग राबवुन शेतकरी राजामध्ये समृद्धी आणली.
शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे प्रशिक्षण मिळावे यासाठी त्यांनी शेतकी शाळा सुरू केल्या. महाराज आपल्या कार्यकाळात शेतकऱ्यांकरता आधुनिक शेतीचे तंत्र कळावे याकरता कृषी प्रदर्शने भरवली. त्यांनी आपल्या राज्यातील अनेक तोफा इंग्रजांना न देता त्या किर्लोस्कर ह्या शेती अवजारे बनवणारी कंपनीला अवजारे बनविण्याकरता दिल्या होत्या. यावरून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची शेतीविषयक असणारी तळमळ दिसुन येते.
छत्रपती शाहू महाराज हे कुस्तीप्रेमी राजे होते, त्यांचे कुस्तीवर विशेष प्रेम होते. महाराजांनी कुस्तीचे खासबाग हे पन्नास हजार लोकं बसतील एवढे भव्य मैदान बांधुन घेतले त्यातच खुले नाट्यगृह उभारून दुहेरी हेतु साध्य केला. छत्रपती शाहू महाराजांमुळेच आज कोल्हापुर कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते. महाराजांनी अनेक पैलवान आपल्या लाल आखाड्यात तयार केले अनेक कुस्तीवीरांना त्यांनी राजाश्रय दिला.
कोल्हापुरात हत्तीची मस्ती जिरवण्यासाठी साठमारीचा खेळ खेळला जात असे त्याकरता महाराजांनी चार ठिकाणी साठमारीचे मैदाने बांधली होती.
छत्रपती शाहू महाराज जाणुन होते की, शिक्षणाशिवाय समाजाची उन्नती होणे शक्य नाही त्यामुळे त्यांनी शैक्षणिक चळवळीला प्रोत्साहन देण्याचे महान कार्य प्रत्यक्ष आर्थिक मदत करून केले होते त्याच बरोबर अनेक शाळाच्या, काॅलेजच्या, वस्तीगृहाच्या इमारती त्यांनी बांधल्या.
त्यात, व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, सारस्वत विद्यार्थी वस्तीगृह, सर सबनीस कायस्थप्रभु विद्यार्थी वस्तीगृह, मुस्लिम विद्यार्थी बोर्डिंग, नामदेव शिंपी विद्यार्थी वस्तीगृह, जैन विद्यार्थी वस्तीगृह, मिस क्लास वस्तीगृह, आर्यसमाज पाठशाळा (शाहू दयानंद हारस्कूल), तसेच, नाशिक येथे समाजधुरीणांना सोबत घेऊन उदोजी मराठा बोर्डींगच्या इमारतीचे पायाभरणी केली ती नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक यांची पहिली इमारत आज हिच शिक्षण संस्था महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्थेनंतर दोन क्रमांकाची नावाजलेली संस्था आहे. त्याचबरोबर महाराजांनी वंजारी बोर्डींगची स्थापना केली तसेच, ५००० हजार रूपये मदत देखील केली आज हि संस्था क्रां. वसंतराव नाईक शिक्षण संस्था म्हणुन ओळखली जाते.
महाराजांनी देवस्थानांतील तसेच इनामदार,सरंजामदारांकडून पट्टी वसुल करून प्राथमिक शिक्षणाकरता खर्च केला. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरला रेल्वेने जोडले शहरात शाहू महाराजांनी भव्य असे रेल्वे स्टेशन बांधले. रेल्वे स्टेशनच्या नजीकच व्यापार वृद्धीसाठी शाहूपुरी हि एक व्यापारपेठ वसवली. यात अनेक सुविधा निर्माण केल्या त्यामुळे व्यापार वाढला अप्रत्यक्षपणे याचा शेतकरी राजाला फायदा झाला. महाराजांनी सहकारी तत्वावर कापड गिरणीही सुरू केली तिचे नाव श्री शाहू छत्रपती स्पिनिंग & विविंग मिल(शाहू मिल). छत्रपती शाहू महाराजांना आपल्या पुर्वजांबद्दल खुप आत्मीयता होती. त्यांनी त्यांचे आजोबा छ. राजाराम महाराज इटलीत निधन पावले त्याठिकाणी जाऊन त्यांच्या स्मरणार्थ एक सुंदर दगडी छत्री बांधुन घेतली.
महाराजांचे पुर्वज चिमासाहेब महाराजांचे इंग्रजांच्या नजर कैदेत असतांना कराची येथे निधन झाले होते. त्याठिकाणी महाराजांनी कराचीतील लियारी नदी काठावर एक मंदिर बांधुन घेतले व त्या ठिकाणी भेटही दिली.
छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराबाईंचे स्मारकही बांधले.
सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताची चांदीची प्रतिमा बनवून घेतली. तसेच, किल्ले सिंधुदुर्गातील शिवरायांच्या मंदिरासमोर सभामंडप शाहू महाराजांनी बांधुन घेतला.
तसेच, छ. शाहू महाराजांनी पुणे येथे शिवस्मारक बांधण्याची योजना आखुन याचा पायाभरणी समारंभही तत्कालीन ब्रिटिश युवराज वेल्स यांच्या हस्ते घडवून आणला हे स्मारक शाहू महाराजांच्या मृत्युनंतर आकाराला आले.
छत्रपती शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाईंचा रथोत्सव कोल्हापुरमध्ये सुरू केला.
महत्वाचे म्हणजे छत्रपती शाहू महाराजांनी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या जीर्णोध्दारासाठी भरघोस आर्थिक मदत दिली होती.
तसेच,थोर शिव इतिहासकार कृ. अ. केळुस्करांना प्रेरणा मिळावी म्हणुन त्यांनी लिहलेल्या शिवचरित्राच्या ३००० हजार प्रती विकत घेऊन त्यांना २००० हजारांची मदत देखील केली होती.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजकीय, सामाजिक, शेती, शैक्षणिक, कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रात काम करण्यार्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात. त्यांनी केलेले कार्य चिरंतर राहिल यात काही वादच नाही त्यांनी घेतलेले निर्णय आजच्या युगातही प्रशासकीय निर्णय घेताना त्यांचा विचार करावा लागतो यातच त्यांचे व्यक्तीमत्व किती महान होते हे दिसुन येते.

छत्रपती शाहू महाराज जयंती 26/6/2026..! त्यानिमित्त…एक घटना

छत्रपती शाहू महाराज यांचे शतपैलू असे व्यक्तीमत्व होते. शिक्षण, शेती, व्यवस्थापन, खेळ, कला, न्याय, समाजकारण, राजकारण, संस्कृती, पशुविद्यातज्ञ अशा सर्वच क्षेत्राचे ते चांगले आणि अभ्यासपूर्ण जाणकार होते. अशा शाहू महाराजांना शिकार आणि मल्लविद्या यांची विशेष आवड होती. हिंसक पशूंची, डुकरांची शिकार ते सहजपणे करायचे. त्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांना कुस्तीची तर विलक्षण आवड होती. त्यांची शरीरयष्टि अत्यंत धिप्पाड होती. त्यांची उंची आणि विलोभनीय असा प्रभावशाली चेहरा त्यांच्या वैभवशाली जीवनाची साक्ष देत असे. कुस्त्यांच्या फडामध्ये अनेक मोठमोठ्या दिग्गज पैलवानाला ते सहजपणे उचलून अलगद धरायचे. घोड्यावर रपेट करणे याचीही त्यांना मोठी आवड होती. जनावरांच्या क्रोधावर ते सहजपणे विजय मिळवायचे. त्यावेळी त्यांच्याकडे अनेक प्रकारचे घोडे, खेचरे, गाई, बैले, म्हशी, कुत्रे इत्यादी जनावरेही अत्यंत चपळ आणि सशक्त असायची. अनेक प्राण्यांना छत्रपती शाहू महाराजांनी लळा लावला होता. जिथे ते बसायचे त्या ठिकाणी तेथे अनेक हिंस्त्र व पाळीव प्राणी मुक्तपणे वावरत असायची. अनेक प्राणी परस्पर खेळायचे ; तर एकमेकांशी सलगीने वागत असत. बऱ्याच वेळा अनेक प्राणी महाराजांच्या हुकुमाप्रमाणे काम करीत असत. आपल्या राज्यात काही अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत. याचा महाराजांना सुगावा लागला होता. अनेकवेळा तसे ते काहीना बोलून दाखवत असत. भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना महाराज अत्यंत चातुर्याने पकडत व त्यांच्याकडून कबुली करून घेत असत. एकदा एका अधिकाऱ्याकडून भ्रष्टाचाराचा गुन्हा कबूल करून घ्यायचा होता. बऱ्याचवेळा महाराज त्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय करीत राहिले; पण तो अधिकरी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नव्हता. शेवटी महाराजांनी एका हिंस्त्र वाघाला त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीजवळ बसवून स्वतः आतमध्ये निघून गेले. इकडे त्या अधिकाऱ्याला वाघ हलु देत नव्हता. थोडा जरी तो हलला की, वाघ डरकाळी फोडायचा. त्या अधिकाऱ्याला तेथून पळून जाणे किंवा लपून बसणे शक्यच नव्हते. महाराज त्या वाघाला इशारा करून निघून गेल्याने तो वाघ त्या अधिकाऱ्यावर नजर रोखूनच बसला होता. त्या वाघाचे ते आक्राळ-विक्राळ रूप आणि त्याची कृती बघून अधिकारी घाबरून गेला. त्याला काही सुचेनासे झाले. त्याची घाबरगुंडी उडाली; पण हलता येत नव्हते. शेवटी जीव एकवटून त्याने महाराजांना हाक दिली व म्हणाला, “महाराज मी गुन्हा कबूल करतो पण माझा जीव वाचवा” शेवटी त्या अधिकाऱ्याने कबूल केले. महाराज आपल्या कौशल्याने युक्ती साधून त्या भ्रष्ट अधिकाऱ्याला पकडले. त्यामध्ये ते यशस्वी झाले. असे हे महाराज प्राण्यावर खूप दयामाया करायचे. त्यांना जीव लावायचे. लळा लावायचे. प्राणीही त्यांच्यावर प्रेम करायचे. असे हे छत्रपती शाहू महाराज प्राणिप्रिय होते.

About Belgaum Varta

Check Also

जागतिक बालमजुरी विरोधी दिन विशेष : बालपणाच्या हातात पुस्तके द्या, मजुरीची ओझी नाही!

Spread the love  “मूल म्हणजे मातीचा गोळा… आकार द्यावा तशी मूर्ती घडते.” बालपण हा शब्द …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *