Sunday , August 16 2026
Breaking News

‘आधी तालुक्याची तहान भागवा, मगच इतरत्र पाणी द्या’ : खानापूरच्या पाण्याच्या प्रश्नावर ब्लॉक काँग्रेसची आक्रमक भूमिका

Spread the love

 

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीसाठीच्या सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवूनच उर्वरित पाणी इतर भागांना द्यावे, अशी ठाम भूमिका खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसने मांडली आहे. मलप्रभा नदीच्या पाण्याबाबत तालुक्याच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत, याप्रकरणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी मौन सोडावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

ब्लॉक काँग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची गरज प्रथम पूर्ण झाली पाहिजे. त्यानंतर जर पाणी शिल्लक राहिले, तरच ते इतर भागांकडे वळविण्यात यावे. मात्र सध्या तालुक्याच्या गरजा पूर्ण होण्यापूर्वीच इतरत्र पाणी दिले जात असल्याची चर्चा असून, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, मलप्रभेचे पाणी वळविल्याबाबत प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियामध्ये सातत्याने बातम्या येत असतानाही तालुक्यातील भाजपचे नेते आणि भाजपा एकीकरण समिती यांची भूमिका स्पष्ट होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

खानापूरच्या पाण्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा इशारा देत ब्लॉक काँग्रेसने म्हटले आहे की, “आधी खानापूर तालुक्याचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. त्यानंतरच उर्वरित पाणी इतरत्र देण्याचा निर्णय घ्यावा. मात्र तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर दुसऱ्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केल्यास खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस गप्प बसणार नाही.”

भविष्यात तालुक्यावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवू नये, यासाठी सर्व पक्षांनी राजकारण बाजूला ठेवून खानापूरच्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहनही ब्लॉक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूरातील महामेळाव्यातील प्रक्षोभक भाषणाचा खटला निकाली; रामदास कदम, नितीन बानुगडे-पाटील निर्दोष

Spread the love  बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २६ ऑक्टोबर २००६ रोजी खानापुरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *