

विद्यार्थी, नागरिक व प्रवाशांची गैरसोय दूर; केएसआरटीसी अधिकाऱ्यांची उपस्थिती
येळ्ळूर : येळ्ळूर येथील श्री हणमंतगौडनगर परिसरातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश आले असून नव्याने मंजूर झालेल्या बसथांब्याचे उद्घाटन मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या बसथांब्यामुळे परिसरातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच प्रवाशांची वाहतुकीची गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हणमंतगौडनगर रहिवासी संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत बा. पाटील हे होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी त्यांच्या हस्ते श्री थडेदेव यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बसथांब्याच्या नामफलकाचे पूजन माजी ग्रामपंचायत अध्यक्ष श्री सतीश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या बसथांब्यासाठी श्री. सतीश पाटील यांनी परिवहन मंडळ, बेळगाव येथे सातत्याने पाठपुरावा करून तसेच वेळोवेळी निवेदने सादर करून बसथांबा मंजूर करून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वीही त्यांनी श्री हणमंतनगर परिसरातील विविध नागरी समस्यांची दखल घेत केईबीमार्फत पथदीप उभारणे तसेच श्री थडेदेव मंदिर परिसरात हायमास्ट दिव्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ते म्हणाले, “कोणतेही विकासकाम सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच पूर्णत्वास जाते. समाजहिताची कामे प्रामाणिकपणे आणि चिकाटीने केल्यास निश्चित यश मिळते. युवकांनीही समाजाच्या प्रश्नांसाठी पुढाकार घेऊन सातत्याने प्रयत्न करावेत.” तसेच श्री हणमंतनगर परिसरातील भविष्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून त्या सोडविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी श्री हणमंतगौडनगरच्या नामफलकाचे पूजन श्री. अरविंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतात परिसराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. श्री. अरविंद पाटील यांनी आमदार निधीतून श्री हणमंतनगर परिसरातील रस्त्याच्या विकासकामासाठीही विशेष प्रयत्न केले असून त्याबद्दल त्यांचाही कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
उद्योजक श्री. एन. डी. पाटील यांनी बसथांब्याजवळ प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच आसनव्यवस्था उभारण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमात केएसआरटीसीचे अधिकारी श्री. सुरेश हिरेमठ व श्री. शंकर वडेयार यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा रहिवासी संघटनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी श्री चांगळेश्वरी विद्यालयाचे शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, श्री हणमंतगौडनगर नगर रहिवासी संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पांडुरंग अ. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. अनिल पुं. पाटील यांनी मानले.
नागरिकांनी बसथांबा मंजूर करून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे आभार मानत, हा बसथांबा परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याची तसेच परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये झालेली सुधारणा आणि लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे श्री हणमंतनगरच्या विकासाला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली.
Belgaum Varta Belgaum Varta