

शेतकऱ्यांकडून तयारी सुरू; तंबाखू क्षेत्र वाढण्याचा अंदाज
निपाणी (वार्ता) : तंबाखू लावणीचा हंगाम पंधरा दिवसावर येऊन ठेपल्यामुळे निपाणीसह परिसरात शेतकऱ्यांकडून तंबाखू लावणीसाठी तयारी सुरू झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहिल्यास गतवर्षीच्या तुलनेत यंदा तंबाखूचे क्षेत्र वाढणार असून ७ हजार हेक्टरमध्ये तंबाखू लावणी होणार आहेत.
परिसरात ७ हजार हुन हेक्टर क्षेत्रात तंबाखूचे पीक घेतले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पंधरवड्यात तंबाखू लावणी सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी १५ दिवसापूर्वीच तंबाखू तरुसाठी गादीवाफे तयार करून तरू टाकले होते. सध्या तरूची चांगली उगवण झाली असून तरू लावणी योग्य होण्यासाठी अद्यापही १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. सध्या शेतकऱ्याकडून तरू खराब होऊ नये, यासाठी औषध फवारणी करून देखभाल केली जात आहे.
गतवर्षी खराब हवामानाचा फटका तंबाखू तरुला बसला होता. त्यामुळे महागड्या दराने तरु विकत आणून शेतकऱ्यांना लावणी कराव्या लागल्या होत्या. यावर्षी जून महिन्यात पावसाने दांडी मारली होती. त्याचाच परिणाम म्हणून खरीप पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नसून परिसरात तंबाखूचे क्षेत्र गतवर्षपिक्षा यंदा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या लावणीसाठी सोडलेल्या रिकाम्या शेतातील तण मजूरांच्या सहाय्याने काढले जात आहे. त्यानंतरच रासायनिक खते दिली जात आहेत. शेतकऱ्यांकडून खतांसाठी हिरवळीच्या खतांना प्राधान्य दिले जात आहे. रासायानिक खतांपेक्षा हिरवळीचे खत जमिनीचा पोत सुधारण्यास मदत करत असते.
सध्या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार केल्यास तंबाखू पीक घेणे शेतकऱ्याला कसरतीचे होत चालले आहे. अशातच चौथाही भागाने शेती कसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात शेती पिकवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. काही शेतकऱ्यांनी तर वाढत्या खर्चाचा विचार करून शेतफाळा घेऊन शेती दुसऱ्यांना कसण्यास दिल्याचे चित्र दिसत आहे. शेतीकामासाठी दिवसाकाठी २५०-३०० रुपये मजुरी मिळत असल्यामुळे शेतमजूर तिकडे वळू लागले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta