
स्वतःला मूळ मालकीण भासवत उपनोंदणी कार्यालयात ‘रिलीज डीड’; मार्केट पोलिसांची कारवाई
बेळगाव : बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःला मालमत्तेची मूळ मालकीण भासवत उपनोंदणी कार्यालयात हक्कत्यागपत्र (रिलीज डीड) नोंदवून फसवणूक केल्याप्रकरणी मार्केट पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. शुभांगी विजय सुळे भावीकर (वय ४०, रा. पिरणवाडी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
मार्केटचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक हुसेन साब केरूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
या प्रकरणी शिवबसवनगर येथील दीपक मारुती इंजळ यांनी ३१ मे २०२५ रोजी मार्केट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी दीपक यांची बहीण कविता प्रदीप देसाई यांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या हक्कत्यागपत्राची नोंदणी करण्यासाठी आरोपी शुभांगी उपनोंदणी कार्यालयात हजर झाली होती.
‘मीच कविता’ सांगत केली फसवणूक
मालमत्तेच्या मूळ मालकीण कविता देसाई असल्याचे भासवत शुभांगीने उपनोंदणी कार्यालयात ‘आपणच कविता’ असल्याचे सांगितले. नोंदणी प्रक्रियेदरम्यान तिचा वेब कॅमेऱ्याद्वारे फोटो घेण्यात आला, तसेच बोटांचे ठसेही घेण्यात आले. अशा प्रकारे खोटी ओळख सांगून हक्कत्यागपत्राची नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या फसवणुकीसाठी इम्रान अब्दुल मिश्रीकोटी (रा. उज्वलनगर) याने आपल्याला फूस दिल्याची कबुली शुभांगीने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
इम्रान आधीच पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, अशाच प्रकारच्या एका प्रकरणात इम्रान मिश्रीकोटी याला मार्केट पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बनावट कागदपत्रे, खोटी ओळख आणि मालमत्ता व्यवहारातील फसवणुकीच्या या प्रकरणाचा पुढील तपास मार्केट पोलिसांकडून सुरू आहे.
Belgaum Varta Belgaum Varta