
बेळगाव : जास्त व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्याप्रकरणी आरोप असलेल्या शिवम असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक शिवानंद निलण्णावर यांच्यावर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धाड टाकली.
बेळगावातील शिवबसव नगर येथील त्यांच्या अपार्टमेंटमधील निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या प्रकरणी यापूर्वी बीयूडीएस (BUDS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याचा तपास सध्या सीआयडीकडून सुरू आहे. या तपासादरम्यान ईडीनेही आर्थिक व्यवहारांच्या अनुषंगाने कारवाई सुरू केली आहे.
धाडीदरम्यान शिवानंद निलण्णावर यांची पत्नी संगीता तसेच जावई संजू यांची ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. मंगळुरू व गोवा येथील ईडीच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला असून घरातील कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली.
याशिवाय निलण्णावर यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणीही धाडी टाकण्यात आल्या. बेळगाव जिल्ह्यातील बडकुंद्री येथील निवासस्थानासह चिक्कोडीतील सुभाष यांच्या घराचीही झडती घेण्यात आली.
या प्रकरणात १५ मे रोजी एसीपी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टप्प्यात छापेमारी झाली होती. त्यानंतर माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपासासाठी तो सीआयडीकडे वर्ग करण्यात आला. सीआयडीचा तपास सुरू असतानाच ईडीच्या कारवाईमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta