Monday , August 17 2026
Breaking News

मुतगा ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवी यात्रेला उत्साहात प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील मुतगा गावच्या ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीच्या वार्षिक यात्रेला शुक्रवारी पहाटे धार्मिक वातावरणात उत्साहपूर्ण प्रारंभ झाला. पारंपरिक पूजा-अर्चा, धार्मिक विधी आणि भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत यात्रेच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली.

यात्रेनिमित्त सकाळी गावातील विविध मंदिरांमध्ये देवी-देवतांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री भावेश्वरी देवीच्या मूर्तीची विशेष पूजा करून ती मंदिरात आणण्यात आली. गावातील परंपरेनुसार हक्कदार असलेल्या आठ घराण्यांनी देवीची ओटी भरून अर्पण केली. हा विधी पूर्ण झाल्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

अनेक पिढ्यांपासून सुरू असलेल्या या यात्रेपूर्वी महिनाभर विविध धार्मिक विधी आणि व्रतांचे पालन केले जाते. यात्रेनिमित्त गावासह परिसरातील हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने देवस्थान समिती, ग्रामपंचायत, गाव सुधारणा मंडळ, युवक मंडळ आणि ग्रामस्थांनी विशेष व्यवस्था केली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी दर्शनाच्या स्वतंत्र रांगा, वाहतूक नियोजन आणि पार्किंगची सुविधा हायस्कूल व मराठी शाळेच्या मैदानात उपलब्ध करून देण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देवस्थान पंचकमिटीचे सदस्य भाऊ पाटील यांनी भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करून वाहने गावाबाहेरील पार्किंगमध्ये उभी करावीत, असे आवाहन केले. तर पंचकमिटीचे हेमंत पाटील यांनी यात्रेतील पारंपरिक प्रथांचे पालन करण्याचे आवाहन करत, देवीच्या ओटीमध्ये नारळाऐवजी पारंपरिक पद्धतीने वाटी-कोपरे अर्पण करण्याची प्रथा असल्याचे सांगितले.

संध्याकाळपर्यंत यात्रास्थळी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, सर्व धार्मिक कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *