Monday , August 17 2026
Breaking News

रेशनकार्डधारकांनो सावधान! ई-केवायसी नाही तर रेशन बंद!

Spread the love

 

जिल्ह्यातील 18 लाख 59 हजार 786 सदस्य ई-केवायसीच्या प्रतीक्षेत; अन्न व नागरी पुरवठा विभागाची कडक भूमिका

बेळगाव : रेशन वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासह मृत, स्थलांतरित आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ई-केवायसी प्रक्रिया पुन्हा अनिवार्य केली आहे. ई-केवायसीची मुदत संपलेल्या शिधापत्रिकांवरील सदस्यांना आता पुन्हा ओळख पडताळणी करावी लागणार असून, ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधित सदस्याचे रेशन तात्पुरते बंद करण्यात येणार आहे.

बेळगाव जिल्ह्यात तब्बल 22 लाख 44 हजार 860 शिधापत्रिकांवरील सदस्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 3 लाख 85 हजार 74 सदस्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. त्यामुळे तब्बल 18 लाख 59 हजार 786 सदस्य अद्याप ई-केवायसीच्या प्रतीक्षेत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने लाभार्थी अद्याप प्रक्रियेबाहेर असल्याने विभागाची चिंता वाढली आहे.

बीपीएल, एपीएलसह अंत्योदय लाभार्थ्यांनाही सक्ती

बीपीएल, एपीएल तसेच अंत्योदय अन्न योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्याने स्वतः उपस्थित राहून बोटांचे ठसे अथवा ओटीपीच्या माध्यमातून ओळख पडताळणी करणे आवश्यक आहे. कुटुंबातील एका सदस्याची ई-केवायसी झाली म्हणजे संपूर्ण कुटुंबाची प्रक्रिया पूर्ण झाली असे मानले जाणार नाही. प्रत्येक सदस्याची स्वतंत्र पडताळणी करण्यात येणार आहे.

ई-केवायसी नाही तर त्या महिन्याचे धान्य नाही!

निर्धारित कालावधीत ई-केवायसी पूर्ण न करणाऱ्या सदस्याचे नाव शिधापत्रिकेतून तात्पुरते निष्क्रिय करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित सदस्याला त्या महिन्याचे रेशन मिळणार नाही. त्यानंतर ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच संबंधित सदस्याचे नाव पुन्हा सक्रिय करण्यात येणार आहे.

रेशन दुकानातच सुविधा उपलब्ध

लाभार्थ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व रेशन वितरण दुकानांमध्ये ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ई-केवायसीसाठी शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधारकार्ड आणि आधारशी लिंक असलेले मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.

या प्रक्रियेमुळे शिधापत्रिकेवरील मृत, स्थलांतरित किंवा अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळणे शक्य होणार असून, पात्र लाभार्थ्यांनाच अन्नधान्याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. परिणामी रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, अचूक आणि प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन

राज्य सरकारने ई-केवायसीसाठी अद्याप अंतिम मुदत जाहीर केलेली नसली तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यान ही मोहीम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता पात्र लाभार्थ्यांनी तातडीने जवळच्या रेशन वितरण दुकानात जाऊन ई-केवायसी पूर्ण करून घेण्याचे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

ई-केवायसीकडे दुर्लक्ष करणे महागात पडणार असून, प्रक्रिया पूर्ण न केल्यास रेशनच्या लाभापासून तात्पुरते वंचित राहावे लागू शकते.

About Belgaum Varta

Check Also

मंगळागौरीच्या पारंपरिक खेळांनी रंगला ‘सखी’चा सांस्कृतिक सोहळा

Spread the love  बेळगाव : महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा सुगंध, मंगळागौरीच्या खेळांचा उत्साह आणि महिलांच्या कलागुणांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *