Sunday , August 16 2026
Breaking News

‘कृतज्ञता हीच खरी उपासना’; निरपेक्ष भावनेने काम करणारा कार्यकर्ता हाच खरा कार्यकर्ता : प्रल्हाद पै

Spread the love

 

बेळगाव : “आपल्याकडे जे काही आहे ते सद्गुरूंमुळे मिळाले आहे, याची जाणीव ठेवून सद्गुरूंनी दिलेले ज्ञान आचरणात आणले पाहिजे. कोणत्याही पदाची, पैशाची, कौतुकाची किंवा मानाची अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने काम करणारा कार्यकर्ता हाच खरा कार्यकर्ता होय,” असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.

जीवनविद्या मिशन, ज्ञानसाधना केंद्र, बेळगावतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव-२०२६ ‘कृतज्ञता दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. रविवारी मराठा मंदिरच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून प्रल्हाद पै उपस्थित होते.

‘कृतज्ञता हीच खरी उपासना’ या विषयावर मार्गदर्शन करताना पै म्हणाले, “आपले जीवन कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर आधारित असले पाहिजे. कृतज्ञता ही ईश्वराच्या जवळ नेणारी भावना आहे. त्यामुळे मनात सदैव कृतज्ञता ठेवा. ‘कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात’ हा यशस्वी जीवनाचा मूलमंत्र लक्षात ठेवा.”

“माणसाला पैसा, संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळाल्यानंतर अनेकदा अहंकार वाढतो. सत्ता, संपत्ती आणि पदामुळे वाढलेला अहंकारच शेवटी माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरतो. त्यामुळे सद्गुरूंनी दिलेले ज्ञान आणि शहाणपण आत्मसात करा. आनंद वाटा, आनंद लुटा आणि जीवनात आनंदी राहा,” असे आवाहनही त्यांनी केले.

गुरुपौर्णिमा महोत्सव तीन दिवस साजरा होत असून रविवारी सकाळी हरिपाठाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘संगीत जीवनविद्या’ हा कार्यक्रम झाला. बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी नृत्य व गीतांचे सादरीकरण केले. गुरुपूजनांतर्गत ११ जोडप्यांच्या हस्ते सद्गुरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

जीवनविद्या मिशन नाथ संप्रदायाची परंपरा जपत असल्याने सद्गुरूंची ‘मानसपूजा’ करण्याची परंपराही यावेळी पार पडली. तसेच बेळगाव शाखेला सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रल्हाद पै यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

जीवनविद्या मिशनतर्फे अवयवदान व रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून केएलईच्या प्रभाकर कोरे रुग्णालयाला मदत केली जाते. याबद्दल प्रीती दोडवाड व डॉ. माधव प्रभू यांच्या वतीने प्रल्हाद पै यांचा सन्मान करण्यात आला. अवयवदानासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे ३५० जणांनी अर्ज भरले.

बेळगाव व परिसरात जीवनविद्या मिशनची २८ उपकेंद्रे असून या महोत्सवाला सुमारे चार हजार साधकांची उपस्थिती होती. दिवसभर सद्गुरूंनी दिलेली विश्वप्रार्थना तसेच ‘प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची, विश्वशांतीची’ ही प्रार्थना सामूहिकरित्या करण्यात आली.

शेकडो साधकांना अनुग्रह

प्रल्हाद पै यांच्या हस्ते शेकडो साधकांना अनुग्रह देण्यात आला. यावेळी त्यांनी चांगल्या संगतीचे महत्त्व सांगत शरीराची काळजी घेण्याचा सल्ला दिला. “चांगले खा, चांगला विचार करा, त्यामुळे प्रकृती चांगली राहील,” असे ते म्हणाले.

मराठा मंदिर परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते. प्रवचनकार शंकरराव बांदकर, शाखाध्यक्ष शैलेश शिरोडकर, सचिव सतीश बेकवाडकर, खजिनदार दीपक बिरजे, सल्लागार प्रभाकर देसाई, अंतर्गत हिशेब तपासणीस तानाजी पाटील, मुंबईचे पालक ट्रस्टी विलास परब आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुरा शिरोडकर आणि प्रशांत बिरजे यांनी केले. सोमवारी मराठा मंडळ पॉलिटेक्निक येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

मराठी व कन्नड शाळांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love  मच्छे : येथील सरकारी मराठी प्राथमिक केंद्र शाळा व कन्नड प्राथमिक शाळेच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *