
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ येथील सुमारे १०० ते १२५ शेतकरी कुटुंबांनी आपल्या हक्काच्या जमिनीच्या संरक्षणासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. पूर्वजांपासून कसत असलेल्या जमिनीवर भू-माफिया आणि काही प्रशासनिक घटकांकडून कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमीन गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ त्यांच्या कुटुंबांकडून कसली जात आहे. १९७२ च्या ट्रिब्युनल कायद्यानुसार जमीन कसणाऱ्यांच्या हक्काचे समर्थन करणारे फॉर्म क्रमांक ७, फॉर्म क्रमांक १० यांसह आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, पूर्वीच्या मालकांच्या माध्यमातून काही भू-माफिया जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या प्रकाराला विरोध केल्यानंतरही प्रशासन आणि पोलिसांकडून शेतकऱ्यांच्या तक्रारींची योग्य दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हटले.
मोर्चादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देत सरकार आणि भू-माफियांवर टीका केली. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, उपविभागाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून तो तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. भविष्यात आपल्या जमिनीतील एक इंचही जागा कोणालाही देणार नसल्याचा निर्धारही आंदोलकांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय रयत संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा दयामरणाची परवानगी द्यावी, अशी तीव्र मागणी करण्यात आली. प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी आणि कायदेशीर हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

Belgaum Varta Belgaum Varta