
मच्छे : दरवर्षीप्रमाणे मच्छे येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळेतील एलकेजी, युकेजी आणि इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना तसेच लक्ष्मीनगर, मच्छे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष गजानन छप्रे होते. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्याध्यक्ष श्री. सचिन केळवेकर यांनी समितीतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना गावातील प्रतिष्ठित नागरिक व मराठीप्रेमी श्री. बजरंग धामणेकर यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्याचे कौतुक केले. मराठी भाषेसमोर विविध आव्हाने निर्माण होत असताना भाषा संवर्धनासाठी समितीचे कार्यकर्ते अहोरात्र कार्यरत आहेत, ही निश्चितच कौतुकाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भाषा संवर्धनाचा पाया प्राथमिक शिक्षणातच घातला जातो. प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या मनात मातृभाषेविषयी गोडी आणि आपुलकी निर्माण होते. त्यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने भाषा संवर्धनाच्या कार्याला दिलेले बळ अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या जतनासाठी समिती सातत्याने कार्यरत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मोठा आधार व प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने समितीचे आभार व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका रेश्मा मोदी यांनी केले तर आभार अलका केर्लेकर यांनी केले.
कार्यक्रमास शाळा सुधारणा समितीच्या उपाध्यक्षा सौ. मोहिनी बाळेकुंद्री, सदस्य अमोल लाड, रुपाली कणबरकर, पूजा लाड, प्रशांत नांदोडकर आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे उपाध्यक्ष गुंडू कदम, सुरज कुडुचकर, साईनाथ शिरोडकर, आणि शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta