Sunday , September 20 2026
Breaking News

दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची घेतली भेट; शुभम शेळके यांनी फोनवरून मांडली सीमावासीयांची व्यथा

Spread the love

 

मुंबई : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे उपाध्यक्ष तथा भालकी तालुकाध्यक्ष दिनेश मुधाळे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी जनतेची व्यथा आणि गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनीही देशपांडे यांच्याशी फोनवरून संवाद साधत सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना स्पष्टपणे मांडल्या.

सीमाभागातील मराठी जनतेच्या जखमा आजच्या नाहीत. बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी माणूस गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मातृभाषेसाठी, अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रात सामील होण्याच्या घटनात्मक लढ्यासाठी संघर्ष करत आहे. अशा परिस्थितीत सीमाभागातील मराठी जनतेवर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा यांची मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतलेली भेट सीमावासीयांच्या जिव्हारी लागली.

नारायण गौडा यांनी यापूर्वी बेळगावात येऊन लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी लढणाऱ्या मराठी जनतेविरोधात आक्रमक वक्तव्ये केली होती. या पार्श्वभूमीवर मराठी अस्मितेसाठी लढणाऱ्या मनसेच्या नेत्याने त्यांची भेट घेतल्याने सीमाभागातील कार्यकर्त्यांमध्ये आणि मराठी जनतेमध्ये नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे.

याच भावनेतून दिनेश मुधाळे यांनी देशपांडे यांची भेट घेऊन सीमाभागाची वास्तविक परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शुभम शेळके यांच्याशीही फोनवरून देशपांडे यांचा संवाद करून देण्यात आला. शेळके यांनी सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना, नारायण गौडा यांची भूमिका आणि गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणूस सहन करत असलेला संघर्ष याबाबत सविस्तर माहिती दिली.

यावर संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले की, ही भेट बेळगाव किंवा सीमाप्रश्नाच्या संदर्भात नव्हती, तर देशभरातील हिंदी सक्तीविरोधात व्यापक लढा उभारण्याच्या उद्देशाने ती झाली.

मात्र सीमावासीयांचा प्रश्न इतकाच आहे—हिंदी सक्तीला विरोध करताना देशपांडे यांनी मराठी बहुल सीमाभागात वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कन्नड सक्तीचा इतिहास आणि त्यामागची भूमिका असलेल्या व्यक्तींशी संवाद साधताना त्याच संवेदनशीलतेने विचार करायला नको होता का?

आजच्या News18 ला दिलेल्या मुलाखतीत देशपांडे यांनी, “आम्ही इकडे मराठीची सक्ती करतोय, मग त्यांनी बेळगावात कन्नड सक्ती केली तर गैर काय?” अशा आशयाची भूमिका मांडली आहे. पण बेळगावचा प्रश्न हा केवळ दोन भाषांमधील सक्तीचा प्रश्न नाही. हा प्रश्न इतिहासाचा आहे, सीमावासीयांच्या अस्मितेचा आहे आणि भाषावार प्रांतरचनेच्या वेळी झालेल्या अन्यायाचा आहे.

बेळगावसह संपूर्ण सीमाभाग हा ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्राशी जोडलेला प्रदेश असून, भाषावार प्रांतरचनेच्या वेळी हा मराठीबहुल भाग चुकीने कर्नाटकात गेला, अशी सीमावासीयांची दीर्घकाळची भूमिका आहे. या संपूर्ण इतिहासाचा आणि सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीचा सखोल अभ्यास संदीप देशपांडे यांनी करावा, हीच सीमाभागातील मराठी जनतेची अपेक्षा आहे.

कारण मराठी माणसासाठी हा केवळ भाषेचा विषय नाही—हा त्याच्या मातीचा, अस्मितेचा आणि पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या संघर्षाचा विषय आहे.

हिंदीची सक्ती असो किंवा कन्नडची सक्ती, सक्ती ही सक्तीच असते. मात्र एका सक्तीला विरोध करताना दुसऱ्या सक्तीच्या इतिहासाकडे दुर्लक्ष झाले, तर सीमाभागातील मराठी माणसाच्या मनातील वेदना अधिक तीव्र होतात.

सीमाभागातील मराठी जनता कुणाच्या विरोधात नाही, मात्र आपल्या भाषेचा, संस्कृतीचा आणि अस्मितेचा अपमान सहन करणार नाही.

आज गरज आहे ती एकमेकांवर आरोप करण्याची नाही, तर सीमाभागाचा इतिहास समजून घेण्याची आणि मराठी माणसाच्या वेदनेशी संवेदनशीलपणे जोडून घेण्याची.

सीमाप्रश्न समजून घ्या… सीमावासीयांच्या भावना समजून घ्या… कारण हा संघर्ष अजूनही संपलेला नाही!

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *