
बेळगाव : बेळगाव-कित्तूर-धारवाड या महत्त्वाकांक्षी नवीन रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या कामाला निधीअभावी मोठा फटका बसत असून, राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे प्रकल्पाच्या कामास विलंब होत असल्याचा गंभीर आरोप खासदार जगदीश शेट्टर यांनी केला आहे.
राज्य सरकारकडून अपेक्षित इच्छाशक्ती दाखविली जात नसून आवश्यक निधीच्या वितरणास होत असलेल्या विलंबामुळे या महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल शेट्टर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दिवंगत सुरेश अंगडी रेल्वेमंत्री असताना या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती.
बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मात्र, पुढील टप्प्यातील कामांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध होत नसल्याने प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकल्पासाठी भूसंपादन आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सुमारे ४०० ते ४५० कोटी रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ५० कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप शेट्टर यांनी केला.
बेळगाव जिल्ह्यात सुमारे १,७०० एकर जमिनीच्या संपादनासाठी प्राथमिक व अंतिम अधिसूचना प्रक्रिया पूर्ण झाली असून, अनेक शेतकरी स्वेच्छेने जमीन देण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, राज्य सरकारकडून आवश्यक आर्थिक मदत मिळत नसल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर परिणाम होत आहे.
राज्य सरकार विविध हमी योजनांसाठी दरवर्षी सुमारे ५० हजार कोटी रुपये खर्च करीत असताना, प्रादेशिक विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे प्रकल्पासाठी केवळ ४०० ते ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यास टाळाटाळ करणे दुर्दैवी असल्याची टीका शेट्टर यांनी केली. हा मुद्दा त्यांनी दिल्ली येथे झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही उपस्थित केल्याचे सांगितले.
दरम्यान, हा रेल्वेमार्ग दुग्धव्यवसाय, उद्योग आणि व्यापार क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार असून, बेळगावच्या प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
बेळगाव विमानतळ रस्ता तसेच विविध टर्मिनलशी संबंधित कामे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊन लोकार्पण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. रेल्वे स्थानकावरील फूट ओव्हर ब्रिज आणि एस्कलेटरची कामेही अंतिम टप्प्यात असून ती लवकरच प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहेत.
राज्य सरकारने आपली भूमिका बदलून बेळगाव-कित्तूर-धारवाड रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक असलेला संपूर्ण निधी तातडीने उपलब्ध करून प्रादेशिक विकासाला सहकार्य करावे, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta