
बेळगाव : कणबर्गी येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखेरच्या सोमवारी धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यानिमित्त मंदिर परिसरात भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली असून, हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
श्रावणातील अखेरच्या सोमवारनिमित्त कणबर्गी गावात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. यावेळी काढण्यात आलेल्या पारंपरिक मिरवणुकीने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
मिरवणुकीत ढोल-ताशा पथकाच्या दणदणाटाने वातावरण भारावून गेले. लहान मुले, युवक व युवतींनी सादर केलेल्या विविध साहसी कलेच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक बैलगाड्यांनी मिरवणुकीच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविले.
दरम्यान, श्री सिद्धेश्वर भक्त मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी श्री सिद्धेश्वरांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
श्रावणातील अखेरच्या सोमवारच्या या धार्मिक उत्सवामुळे कणबर्गी गावात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले होते.

Belgaum Varta Belgaum Varta