Sunday , September 20 2026
Breaking News

तिलारीचे पाणी, म्हादाईचा मुद्दा अन् मराठी शाळांचे संरक्षण; मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न, तिलारी व म्हादाई पाणीप्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्न, शिक्षक भरती तसेच मराठी शाळांच्या संरक्षणासह विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा मंदिर येथे समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

बैठकीच्या प्रारंभी रणजीत चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी प्रास्ताविकातून सीमाभागातील प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. सुमारे चार महिन्यांपूर्वी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी समितीची बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याबद्दल बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

तिलारी व म्हादाई पाणीप्रश्नावर चर्चा

तिलारीचे पाणी बेळगावकडे वळविण्याच्या प्रयत्नांबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका काय असावी, यावर बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. त्याचबरोबर म्हादाईचे पाणी धारवाडकडे वळविण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली.

या पाण्याचा लाभ कन्नड भागाला होणार असताना त्यासाठीची पर्यावरणीय अथवा इतर प्रकारची भरपाई सीमाभागातील मराठी गावांवर लादली जाऊ नये, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली.

सीमाप्रश्नाच्या न्यायालयीन लढ्याबाबत चिंता

सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची सद्यस्थिती आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीबाबतही बैठकीत चर्चा झाली. भाषिक अल्पसंख्याकांशी संबंधित न्यायालयीन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करण्याच्या प्रक्रियेत वकिलांकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

मराठी याद्या व शिक्षक भरतीचा प्रश्न

जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मराठी याद्या सर्वत्र उपलब्ध करून देण्याच्या मागणीसंदर्भात मध्यवर्ती समितीचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. शिक्षक भरतीच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राचाही संदर्भ घेण्यात आला. कर्नाटक विधानसभेत बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी मराठी शाळा बंद करण्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेचा निषेध करण्यात आला. सीमाभागातील मराठी शाळांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

रणजीत चव्हाण पाटील यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्यासोबत होणाऱ्या भेटीच्या नियोजनासंदर्भात माहिती दिली.

तिलारी प्रश्नाबाबत जनजागृतीची गरज

नेताजी जाधव यांनी तिलारी पाणीप्रश्नासंदर्भात माजी नगरसेवक संघटनेच्या बैठकीची माहिती मध्यवर्ती समितीसमोर मांडली. तिलारीचे पाणी वळविण्याच्या विषयाबाबत अनेक नागरिक अद्याप अनभिज्ञ असल्याने या प्रश्नावर व्यापक जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

रणजीत चव्हाण आणि मालोजी अष्टेकर यांनीही या विषयासंदर्भातील बैठकीची माहिती दिली. माजी नगरसेवक संघटनेतील मराठी नगरसेवकांची भूमिका मालोजी अष्टेकर यांनी स्पष्ट केली.

बैठकीत माजी आमदार मनोहर किनेकर, आबासाहेब दळवी, मनोहर हुंदरे, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील आदींनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *