
बेळगाव : सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी संबंधित ठिकाणी झालेल्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवाईविरोधात त्यांच्या समर्थकांनी जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
यावेळी समर्थक अहमद रेशमी यांनी केंद्र सरकार आणि ईडीच्या कारवाईवर तीव्र टीका करत ही कारवाई राजकीय द्वेषातून व सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप केला. सतीश जारकीहोळी हे दलित, गरीब व सामान्य कुटुंबातील नागरिकांसाठी कार्य करणारे नेते असून शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना मदत केल्याचे रेशमी यांनी सांगितले. अशा नेत्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करून त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘ईडीची कारवाई केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच का होते? भाजपच्या नेत्यांवर अशी कारवाई का होत नाही?’ असा सवालही रेशमी यांनी उपस्थित केला.
जारकीहोळी भविष्यात सक्षम दलित मुख्यमंत्री म्हणून पुढे येऊ शकतात. त्यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात असल्याचा दावाही समर्थकांनी केला. केंद्र सरकारने हा कथित राजकीय छळ तातडीने थांबवला नाही, तर संपूर्ण कर्नाटकात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जारकीहोळी समर्थकांनी दिला.

Belgaum Varta Belgaum Varta