Sunday , September 20 2026
Breaking News

चिकाटी आणि अथक प्रयत्नांतूनच यश शक्य : सीए संदीप खन्नुकर

Spread the love

बेळगाव : सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांसमोर विविध आव्हाने आहेत. मात्र, या आव्हानांवर मात करण्यासाठी चिकाटी, शिस्त आणि अथक प्रयत्नांची गरज असून, त्यातूनच यश मिळविता येते, असा विश्वास सीए तथा एस. एम. खन्नुकर असोसिएट्सचे संचालक संदीप खन्नुकर यांनी व्यक्त केला.

शहापूर येथील पंडित नेहरू पदवीपूर्व महाविद्यालयात गुरुवारी सकाळी राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि विश्वभारत सेवा समिती, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संदीप खन्नुकर होते.

यावेळी येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष प्रमोद पाटील, पृथ्वी करिअर अकॅडमीचे संस्थापक तथा मार्गदर्शक अझरुद्दीन मुल्ला आणि श्रीकांत काकतीकर अतिथी म्हणून उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संदीप खन्नुकर म्हणाले की, शिक्षण हा यशस्वी जीवनाचा मूलभूत पाया आहे. विद्यार्थी जीवनातच योग्य मार्गदर्शन मिळाल्यास जीवनाला योग्य दिशा मिळते. त्यामुळे शिक्षणासोबतच गुरुजन, विचारवंत आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी जीवनात शिस्त आणि एकाग्रतेला अनन्यसाधारण महत्त्व असून, घरची परिस्थिती कशीही असली तरी विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील संघर्ष आणि चिकाटीच्या जोरावर मिळविलेल्या यशाचा अनुभवही विद्यार्थ्यांशी शेअर केला.

प्रमोद पाटील म्हणाले की, आजची युवा पिढी विविध कारणांमुळे भरकटण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी आणि युवकांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. जीवनात शिक्षणाला पर्याय नाही, हे विद्यार्थ्यांनी समजून घेऊन आपल्या भवितव्याची योग्य दिशा ठरवावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व अतिथी परिचय विश्वभारत सेवा समितीचे प्रमुख प्रकाश नंदीहळ्ळी यांनी केले. मयूर नागेनटी यांनी सूत्रसंचालन केले, तर धनश्री गाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *