Sunday , September 20 2026
Breaking News

रेशन ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ; आता २० ऑक्टोबरपर्यंत संधी

Spread the love

 

सर्व्हरच्या समस्येमुळे रखडले ५० टक्के काम; रेशन दुकानांच्या वेळेतही बदल

बेळगाव : रेशन कार्डधारकांची ई-केवायसी प्रक्रिया सर्व्हरच्या तांत्रिक समस्येमुळे रखडल्याने अन्न व नागरी पुरवठा खात्याने ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता रेशन कार्डधारकांना २० ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. याशिवाय रेशन दुकानांच्या कामकाजाच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहेत.

ई-केवायसीसाठी सुरुवातीला १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, सर्व्हर डाऊन तसेच तांत्रिक अडचणींमुळे रेशन कार्डधारक आणि रेशन दुकानदारांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ही मुदत वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली होती. तरीही सर्व्हरच्या समस्येमुळे अपेक्षित वेगाने ई-केवायसी पूर्ण होऊ शकली नाही. अद्याप सुमारे ५० टक्के ई-केवायसी प्रक्रिया शिल्लक असल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

ई-केवायसी आणि धान्य वितरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी यापूर्वी रेशन दुकाने सकाळी ६ ते रात्री १० या कालावधीत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आता या वेळेत बदल करून दोन सत्रांत दुकाने सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत रेशन दुकानांचे कामकाज चालणार आहे.

सर्व्हरच्या तांत्रिक अडचणी आणि ई-केवायसी प्रक्रियेला होत असलेला विलंब याची अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री रिझवान हर्षद यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे ई-केवायसीसाठी वाढीव मुदत मिळाल्याने रेशन कार्डधारकांना दिलासा मिळाला आहे. तसेच दुकानांच्या वेळेत बदल झाल्याने रेशन दुकानदारांनाही दिलासा मिळणार असून, या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *