Sunday , September 20 2026
Breaking News

सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरप्रमाणे हिटचा तडाखा; पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

Spread the love

भातासह भुईमूग, रताळी, बटाटा व भाजीपाला कोमेजला; शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे

बेळगाव : सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटप्रमाणे जाणवणाऱ्या उष्म्याने नागरिक हैराण झाले असताना, दुसरीकडे पावसाने दिलेल्या दडीमुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने भातासह विविध पिके कोमेजून करपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे उरलीसुरली पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली असून, आता सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

यंदाच्या पावसाळ्याने गतवर्षीच्या तुलनेत मोठी निराशा केली आहे. खरीप हंगामातील पिके ऐन वाढीच्या आणि हातातोंडाशी येण्याच्या अवस्थेत असताना पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या भात पिकावर त्याचा गंभीर परिणाम झाला असून, पाण्याअभावी भाताची रोपे कोमेजू लागली आहेत.

भाताबरोबरच भुईमूग, रताळी, बटाटा तसेच विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवडही तालुक्यात केली जाते. मात्र, पावसाचा खंड वाढत चालल्याने या पिकांनाही फटका बसत आहे. पिके वाचविण्यासाठी उपलब्ध पाण्याचा आधार घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मात्र, सर्वच क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय अनेक शेतकऱ्यांसमोर पर्याय उरलेला नाही.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाप्पाचे आगमन होत असताना पावसाचेही आगमन होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. मागील दोन दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी तुरळक सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्यानंतर पुन्हा उन्हाचा कडाका वाढल्याने या आशांवर पाणी फेरले गेले.

उष्म्याचा वाढता कडाका आणि पावसाचा लांबलेला खंड यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. खरीप पिकांना सध्या पाण्याची नितांत गरज असताना वरुणराजाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे खिळल्या आहेत. आता केवळ दमदार पावसाची प्रतीक्षा असून, मेघराजा बरसल्यासच हातातोंडाशी आलेली पिके वाचण्याची आशा कायम राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *