







बेळगाव : कित्तूर तालुक्यातील अवरादी ग्रामपंचायत कार्यालय आवारात १६ सप्टेंबर रोजी झालेल्या बाप-लेकीच्या दुहेरी हत्याकांडातील तीन प्रमुख आरोपींना कित्तूर पोलिसांनी अटक केली आहे.
धारवाड येथील रहिवासी रुद्राप्पा शिवनाप्पा कुंदरगी आणि त्यांची मुलगी शशिकला हे अवरादी गावातील मालमत्ता क्रमांक १३५ च्या नाव नोंदणी अर्जाच्या चौकशीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात आले होते. यावेळी मालमत्तेच्या वादातून आरोपी बसाप्पा शिवनाप्पा कुंदरगी, संगाप्पा शिवनाप्पा कुंदरगी आणि मडिवाळाप्पा कुंदरगी यांनी कोयता व दगडाने रुद्राप्पा आणि शशिकला यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. गंभीर मारहाणीत दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
हल्ला थांबविण्यासाठी गेलेल्या राहुल नामक व्यक्तीवरही आरोपींनी कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेनंतर कित्तूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी तपास सुरू केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसर्गी आणि बैलहोंगलचे उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती. कित्तूर सर्कलचे सीपीआय शिवानंद बी. गुडगणट्टी, कित्तूर ठाण्याचे पीएसआय (का. व सु.) भरत एस., पीएसआय (सीबी) जी. जी. हम्पण्णवर आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने कारवाई करून आरोपींना अटक केली.
दुहेरी हत्याकांडातील आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक केल्याबद्दल तपास पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta