


सभासदांना १२ टक्के लाभांश; आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरव
पुणे : बेळगावकरांनी पुणेस्थित बेळगावकरांसाठी स्थापन केलेल्या बेळगाव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सन ७७, लक्ष्मीनारायण पार्क, शॉप नं. ११, ससाणेनगर, हडपसर, पुणे-२८ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी वडगाव खु, पुणे येथील क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान, स्वर्गीय सुषमा स्वराज बचत गट व प्रशिक्षण केंद्र येथे उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मोहन लक्ष्मण पाटील होते. उपाध्यक्ष परशुराम भरमानी चौगुले, संचालक शिवाजीराव जोतिबा पाटील, गावडू विष्णू पाटील, नारायण रामचंद्र पाटील, पांडुरंग बाबुराव कुलम, दत्ताराम मर्यांनी भेकणे, तसेच संचालिका स्नेहा पांडुरंग मुचंडी व गौरी राजेंद्र सुतार यांच्यासह सभासद उपस्थित होते.
प्रारंभी अध्यक्ष मोहन पाटील यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. त्यानंतर संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
सभेच्या निमित्ताने पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सभासदांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सहकार आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त दिलीप सोनावणे, मुख्य प्रशिक्षण अधिकारी नीलाक्षी राऊत उपस्थित होते. अहमदनगर जिल्हा बँकेत जनरल मॅनेजर म्हणून सेवानिवृत्त झालेले तसेच फेसकॉम, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अरुण रोडे यांनी सभासदांची जबाबदारी व कर्तव्ये, केवायसी आणि कर्ज परतफेड या विषयांवर मार्गदर्शन केले.
संस्थेला आर्थिक वर्षात २८ लाख ४१ हजार १८० रुपये १२ पैसे नफा झाला असून सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. सभासद, संचालक आणि कर्मचारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे संस्थेने प्रगती साधली असून संस्थेला ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड, पुणे यांच्यामार्फत देण्यात येणारा स्वर्गीय आमदार शिवाजीराव भोसले आदर्श पतसंस्था पुरस्कार २०२५-२६ या पुरस्कारात गट क्रमांक एक, शहरी विभागातून बेळगाव नागरी सहकारी पतसंस्थेने प्रथम क्रमांक पटकावला. या पुरस्कारामुळे संस्थेच्या पुढील वाटचालीला नवी प्रेरणा मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta