


अपूर्ण कामे, जलवाहिन्यांना गळती अन् गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिक हैराण, एल अँड टीच्या कारभारावर नाराजी
बेळगाव : पाणीटंचाईने हैराण झालेल्या बेळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटींमुळे नागरिकांच्या पदरी निराशाच पडत आहे. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेली अपूर्ण कामे, जलवाहिन्यांना लागलेली गळती, गढूळ पाण्याचा पुरवठा आणि कर्मचाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव यामुळे सध्याचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. त्यामुळे पाण्यासाठी वणवण करणाऱ्या बेळगावकरांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, संबंधित यंत्रणेच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्ते खोदणे, नळजोडणी करणे आणि तोट्या बसविणे यांसारखी कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, अनेक ठिकाणी ही कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यातच जलवाहिन्यांना ठिकठिकाणी गळती लागल्याने गढूळ आणि अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढली आहे.
पाण्यासाठी वणवण, तरीही भरमसाठ पाणीपट्टी!
शहरातील अनेक भागांत आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत २४ तास पाणीपुरवठा योजनेवर नागरिकांची भिस्त आहे. मात्र, योजनेची कामे अपूर्ण राहिल्याने अपेक्षित दिलासा मिळालेला नाही. नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नसतानाही भरमसाठ पाणीपट्टी भरावी लागत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव
२४ तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नळजोडणी करताना खोदकामासाठी एक कर्मचारी, नळजोडणीसाठी दुसरा आणि काँक्रिटीकरणासाठी तिसरा कर्मचारी अशा पद्धतीने काम केले जात असल्याचे दिसून येते. मात्र, या कामादरम्यान नागरिकांना काही अडचणी निर्माण झाल्यास संबंधित कर्मचारी जबाबदारी स्वीकारण्याऐवजी दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे बोट दाखवत असल्याच्या तक्रारी आहेत. ‘हे काम आम्ही करत नाही, दुसरा कर्मचारी येऊन करेल,’ अशी उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
नळजोडणी करताना नागरिकांशी योग्य संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी समजून घेणे अपेक्षित असताना, संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. परिणामी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकारही घडत आहेत. नळजोडणीनंतर काही कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत.
गळतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष; कारवाईची मागणी
एकीकडे शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली असताना, दुसरीकडे जलवाहिन्यांची गळती आणि अपूर्ण कामांकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. २४ तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या योजनेतून प्रत्यक्षात नियमित आणि स्वच्छ पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
एल अँड टी कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, जलवाहिन्यांची गळती शोधून दुरुस्ती करावी, गढूळ पाण्याच्या पुरवठ्याची तपासणी करावी आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. २४ तास पाणीपुरवठ्याच्या आश्वासनाऐवजी प्रत्यक्षात नियमित, स्वच्छ आणि पुरेसे पाणी कधी मिळणार, असा सवालही बेळगावकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Belgaum Varta Belgaum Varta