बेळगाव : सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध भागात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत आहोत. कोरोना काळातील ऑक्सिजनचे महत्त्व हाच यामागील प्रमुख उद्देश आहे. कोरोना महामारीच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व किती आहे ते खऱ्या अर्थाने समजले आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही तर ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी व्यक्त केले.
बेळगाव येथील कॅम्प परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिनेश शिरोळकर, नितीन जाधव, नागराज पाटील उपस्थित होते.
दिनेश शिरोळकर म्हणाले, ‘आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून प्राणवायू आपल्याला फुकट मिळतो आणि आपण झाडांची कत्तल करत सुटलो आहोत, हे कुठेतरी थांबले पाहिजे. प्लास्टिकचाही वापर टाळला पाहिजे. कापडी पिशव्यांचा वापर करावा, वृक्षतोड करू नका. निसर्गाच्या विरूध्द कुणीही जाऊ नये. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. वृक्ष लावून त्याचे जतन करावे. झाडे आहेत म्हणूनच आपण आहोत, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे.’
नितीन जाधव यांनी बोलताना म्हणाले वडाच्या झाडाचे महत्त्व आपल्याला माहीतच असून, त्याद्वारे आपल्याला जास्त ऑक्सिजन मिळतो. केवळ वृक्षारोपण करून जबाबदारी संपली नाही तर त्या वृक्षांचे जतन करून ती जपलीही जाणार आहे. काही वर्षाने त्याला बहारदार रूप येईल.’