Thursday , June 4 2026
Breaking News

मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सर्वाधिक प्रगती करणारा देश : केंद्रीय मंत्री सोमप्रकाश

Spread the love

बेळगाव : गेल्या ८ वर्षांत केंद्र सरकारने गरिबांच्या कल्याणाचा हेतू ठेवून अनेक विकास योजना आणल्या आहेत. या काळात भारत जगातील सर्वाधिक वेगवान प्रगती करणारा देश ठरला आहे असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग खात्याचे राज्यमंत्री सोमप्रकाश यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सत्तेत ८ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त बेळगावातील सुवर्णसौधच्या सभागृहामध्ये आज, सोमवारी केंद्र सरकारच्या महत्वकांक्षी योजनांच्या लाभार्थ्यांसमवेत संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन करून बोलताना सोमप्रकाश म्हणाले, २०१४मध्ये देशात असणारी परिस्थिती आता पूर्ण बदलली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे जनतेच्या मनात नवी आशा निर्माण झाली आहे. गरिबांच्या कल्याणासह भारताला विश्वगुरू बनवण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. सरकारच्या सर्व योजना गरिबांच्या कल्याणाचे उद्दीष्ट असणाऱ्या आहेत.
स्मार्ट उद्योग ऍपमुळे देशातील औद्योगिक क्षेत्राचा विकास होत आहे. भारत जगातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनत चालला आहे. कर्नाटक सरकारही राज्यात उत्तम प्रशासन देत आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमुळे देशात शेतकरी कल्याण योजनांचे प्रमाण चौपट वाढले आहे. दूरदृष्टीच्या योजना, सेवा आणि दक्ष प्रशासनामुळे देशाचा सर्वांगीण विकास होत असल्याचा दावा सोमप्रकाश यांनी केला.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्वला योजना, आयुष्मान भारत, जलजीवन, प्रधानमंत्री मुद्रा योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत, स्मार्टसिटी, एक देश एक रेशन कार्ड, गरीब कल्याण अन्न योजना आदी योजनांच्या लाभार्थ्यांशी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांनी संवाद साधत त्यांची मते जाणून घेतली.
कार्यक्रमात जलसिंचन आणि जिल्हा पालक ​​मंत्री गोविंद कारजोळ, धर्मादाय, हज आणि वक्फ मंत्री, शशिकला जोल्ले, खा. मंगल अंगडी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, कर्नाटक आदिजांबव विकास महामंडळाचे अध्यक्ष आ. दुर्योधन ऐहोळे, अल्पसंख्याक विकास महामंडळाचे अध्यक्ष मुख्तार हुसेन पठाण, आ. अभय पाटील, एमएलसी साबण्णा तळवार, जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., केंद्रीय मंत्री सोमप्रकाश यांचे आप्त सचिव बसंत गर्ग आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेकडो लाभार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बसथांबे व सार्वजनिक ठिकाणांवरील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर; कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सहकार्याचे आवाहन

Spread the love  बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावने शहरातील बसथांबे, पदपथ, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांवरील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *