बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या संपकरी कामगारांनी शुक्रवारी आपला संप मागे घेतला. आ. अनिल बेनके यांच्या शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला.
बेळगाव महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या कामगारांना गेल्या 15 दिवसांपासून सणासुदीच्या काळातही वेतन मिळालेले नाही. ते तातडीने द्यावे तसेच पालिकेतर्फे वेतन अदा करावे, दरमहा 5 तारखेला विनाकपात वेतन द्यावे आदी मागण्यांसाठी पाणी पुरवठा कर्मचार्यांनी पाणी पुरवठा बंद ठेवून संप पुकारला होता. बेळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात निदर्शने करत पाणी पुरवठा कर्मचार्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके यांनी शुक्रवारी संपकरी कामगारांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी संप मागे घेतला.
संपकरी कामगारांना उद्देशून बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, तुमच्या मागण्या लवकरच मान्य करण्यात येतील. त्यासंदर्भात महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकार्यांशी तातडीने चर्चा करून पावले उचलण्यात येतील असे आश्वासन दिले.
यावेळी एल अँड टी कंपनीचे सुहास कामते, लक्ष्मीकांत यांच्यासह महानगरपालिका आणि कर्नाटक नागरी पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
