Monday , April 20 2026
Breaking News

कै. श्री. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांचा स्मृतिदिन हा “शैक्षणिक उपक्रम दिन” म्हणून आचरणात!

Spread the love

 

बेळगाव : मराठा मंडळ चव्हाट गल्लीतील भातकांडे सभागृहामध्ये काल शुक्रवार दि. 22 जुलै रोजी मराठा मंडळ संस्थेचे माजी अध्यक्ष कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या सतराव्या स्मृतीदिनाचे आचरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सौ. राजश्री नागराजू होत्या. संस्थेचे संचालक मंडळ, विश्वस्त मंडळ व संस्थेचा प्रशासकीय वर्ग, संस्थेतील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईश्वस्तवन व स्वागतगीताने झाली. तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वर्गीय कै. नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्या स्मृतीस पुष्पांजली वाहण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून हा दिवस शैक्षणिक उपक्रम दिन म्हणून साजरा करण्यात आला. महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते श्री. गणेश आत्माराम शिंदे यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात शिक्षण पद्धतीच्या क्षितिजावरची रम्य पहाट; नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर सविस्तर विवेचन करून संस्थेच्या सर्व शिक्षकांना तब्बल दोन तास मंत्रमुग्ध केले. शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यानंतर शिक्षण अधिक परिणामकारक होते याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नागराजू यांनी आपल्या संस्थेतून दिले जाणारे शिक्षण हे गुणात्मक असावे यासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याचा मनोदय व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात श्री. संतोष आवण्णावर यांनी शिक्षकांसाठी कृतीयुक्त कौशल्यपूर्ण शिक्षण यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमावेळी संस्था आयोजित शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करून विजेत्यांना अध्यक्षांच्या हस्ते पारितोषकांचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांमधून नाथाजीराव हलगेकर चषकाची मानकरी कु. सौम्या पाखरे ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अरविंद पाटील यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक मंडळ विश्वस्त मंडळ प्रशासकीय वर्ग तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

चित्ररथ मिरवणुकीस नरगुंदकर भावे चौकातून सुरुवात

Spread the love  बेळगाव : मंगळवार दि. २१ एप्रिल २०२६ रोजी शहराच्या ऐतिहासीक परंपरेनुसार सायंकाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *