बेळगाव : राष्ट्र-धर्म प्रथम हा विचार सदैव लक्षात ठेवा आणि राष्ट्र विचारांनी प्रेरीत मित्रांचे संगठण बनवा, असा विचार सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री. चारुदत्त आफळेजींनी मांडला. अंदमानमधील विवेकानंद केंद्रातर्फे चालविल्या जाणार्या 1400 विद्यार्थ्यांच्या विद्यालयात दि. 23 सप्टेंबर रोजी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.एस.विजयकुमार, उपप्राचार्या अर्चना गुप्ता, पूर्णवेळ कार्यकर्त्या सुश्री. प्रियंवदा, वर्षा बुजोने, बेळगावहून निखील नरगुंदकर, किशोर काकडे, देशभक्तीवर आधारित पर्यटन आयोजन करणारे नितीन शास्त्री आदी उपस्थित होते.
प्रारंभी विद्यालयाच्या आवारातच असलेल्या श्री गणपती मंदिर, श्री सरस्वती मंदिर व विद्यालयाच्या परिसराला भेट देण्यात आली. चंदन है इस देश की माटी हे समूह गीत, शांती मंत्र विद्यार्थ्यांनी सादर केला. परीचय, स्वागतानंतर आपल्या भाषणात कीर्तनाचे-इतिहासाचे महत्व, सावरकर बंधूचा देशाप्रती त्याग, अंदमानातील इतर कैद्यांचा सावरकराविषयी असलेला आदर याविषयी छोट्या कथांतून चारुदत्त आफळेजींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व राष्ट्र-मंदिराच्या उभारणीचे आवाहन केले.
