बेळगाव : नववर्षा निमित्त श्री गणेश दूध संकलन केंद्र उचगाव यांच्या वतीने सर्व दूध उत्पादक शेतकरी बंधू-भगिनींना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, दूध केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. सध्या लम्पि सारख्या भयानक रोगाने थैमान घातले आहे. या चर्मरोगाने बाधित जनावरांना कोणताही विमा नसताना जे दूध उत्पादक श्रीगणेश दूध संकलन केंद्राला दूध पुरवठा करतात त्यांना या रोगाने जनावर दगावल्यास नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत गाईसाठी चार हजार रुपये तर म्हशीसाठी सहा हजारांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी श्रीगणेश दूध संकलन केंद्रामध्ये आपले ओळखपत्र जमा केले आहे अशा केंद्राच्या दुध पुरवठादार शेतकऱ्यांना वैयक्तिक सहकार्य देखील केले जाणार आहे. या काळात कोणत्याही शेतकऱ्याची जीवितहानी झाल्यास त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबास पाच हजाराची आर्थिक मदत केली जाईल. तरी श्रीगणेश दूध संकलन केंद्राला दूध पुरवठा करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची (आधार कार्ड, फोटो) पूर्तता करून त्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीगणेश दूध संकलन केंद्राचे संचालक उमेश देसाई यांनी केले आहे.