तालुका म. ए. समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा निर्धार
बेळगाव : कर्नाटक सरकारने येथील म. ए. समितीचा मेळावा होऊ दिला नाही. त्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम कर्नाटकने केले असून त्याविरोधात आता कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि. 26 रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोठ्या संख्येने म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुका म. ए. समितीची बैठक ओरिएंटल स्कूलच्या श्री संत तुकाराम महाराज सभागृहामध्ये झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. व्यासपीठावर शिवाजी सुंठकर, एस. एल. चौगुले, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील होत्या. कर्नाटक सरकारने येथील मराठी भाषिकांवर अन्याय केला आहे. जो मेळावा बंद पाडविला त्याबद्दल प्रथम कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला.
प्रारंभी तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी सोमवारी दसरा चौक येथे सकाळी 11 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये भाग घ्यावा, असे आवाहन केले. मोटारसायकल तसेच इतर वाहनांतून तरुणांनी स्वत:हून यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी या आंदोलनामध्ये सीमाभागातून मोठ्या संख्येने तरुणांनी भाग घ्यावा, असे सांगितले.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर दडपशाही सुरूच केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राने यासाठी जोरदार आवाज उठविणे गरजेचे आहे. अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. या बैठकीमध्ये कृष्णा हुंदरे, पुंडलिक पावशे, आर. एम. चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, प्रकाश अष्टेकर, आप्पासाहेब कीर्तने, रामचंद्र मोदगेकर, मनोहर संताजी यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.