बेळगाव : पुस्तकं दान केल्याचा आनंद हा वेगळा असतो, हे ज्ञान दान दिल्यानं कमी न होता वाढणार असं एकमेव दान आहे.
अरविंद कपाडिया यांनी येळ्ळूर ग्राम पंचायत ग्रंथालयात बरीच पुस्तके देऊन वाचक वर्ग वाढवा अशी इच्छा व्यक्त केली.
ग्रामीण भागात वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी सरकारच्या योजनेअंतर्गत येळ्ळूर पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी तसेच गावातील नागरिक यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्यातून येळ्ळूर ग्रामपंचायतीमध्ये ग्रंथालयाची उभारणी केली आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील यांचे मित्र अरविंद कापडिया यांनी आज येळ्ळूर ग्रामपंचायतीला भेट देऊन या ग्रंथालयाला 120 पुस्तके भेटी दाखल दिली. यावेळी त्यांच्यासोबत रीना कपाडिया, अरविंदचे चुलते USA रहिवाशी भावेश मर्चंट आणि कोषा मर्चंट उपस्थित होते. येळ्ळूर मॉडेल ग्राम पंचायत कार्यालय आणि ग्रंथालय पाहून या सगळ्यांनी समाधान व्यक्त केले आणि अशी स्वच्छ मॉडेल ग्रामपंचायत पूर्ण भारतात असावी अशी भावना व्यक्त केली. यावेळी अध्यक्ष सतीश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. तेच इतर कोणालाही पुस्तके भेट करायची असल्यास येळ्ळूर ग्रामपंचायतीशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.