बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगावात चोरट्यांनी दोन दिवसापूर्वी नेहरू नगर, मच्छे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे घरफोडी केल्यानंतर आज भरदिवसा चोरट्यांनी शहरातील आझाद गल्ली येथील एका बंद घराचा कडी कोयंडा तोडून घरातील पाच लाख रुपये किमतीचा ऐवज लांबविला.
हरचंद प्रजापत हे व्यापारी असून आझाद गल्ली, बेळगाव येथील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लॅटमध्ये भाड्याने राहतात. त्यांच्या घरावर चोरट्यानी आज दिवसाढवळ्या डल्ला मारला.
प्रजापत हे आपल्या दुकानाला गेले होते. तर त्यांच्या पत्नी बाजारहट करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधून चोरट्यांनी बंद घराची कडी तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील तिजोरीचे कुलूप उचकटून त्यामधील सोन्या- चांदीचे दागिने आणि रोकड असा एकंदर साडेचार ते पाच लाखाचा ऐवज घेऊन पोबारा केला.
हरचंद प्रजापत यांच्या पत्नी बाजारहट संपवून घरी परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. घरात चोरी झाल्याचे समजताच, ही बाब त्यांनी आपल्या पतीला सांगितली. पती हरचंद यांनी मार्केट पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
चोरट्यांनी बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. महिनाभरात ठिक ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारला आहे. या दोन दिवसात नेहरूनगर, मच्छे आणि पिरणवाडी येथे चोरी केल्यानंतर आज दिवसाढवळ्या आझाद गल्ली येथील घराला चोरट्यांनी लक्ष्य बनवले. चोरट्यांनी पोलिसांना आव्हानच दिले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून पोलिसांकडे केली जात आहे.