
बेळगाव : येथील श्री छत्रपती शिवाजी उद्यान येथे जायंट्स सखीच्या वतीने अवयवदान जनजागृती कार्यक्रम सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात पार पडला.
आजच्या काळात अवयवदान ही अत्यंत गरजेची व मानवतेला नवजीवन देणारी संकल्पना आहे. अनेक रुग्णांना वेळेवर अवयव न मिळाल्याने प्राण गमवावे लागतात, ही जाणीव लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्रमुख वक्त्या म्हणून के एल ई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या शरीरशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजकुंवर देसाई उपस्थित होत्या. तसेच जायंट्स आय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मदन बामणे, विभागीय संचालक संजय पाटील, शिवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय शीतल नेसरीकर व सचिव दीपा पाटील यांनी करून दिला.
अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. राजकुंवर देसाई यांनी अधिकाधिक नागरिकांनी अवयवदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी अवयवदानाची प्रक्रिया, त्याचे महत्त्व तसेच त्यातून गरजू रुग्णांना नवजीवन कसे मिळू शकते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अवयवदान हे केवळ एक दान नसून दुसऱ्याला जीवनदान देणारे महान कार्य आहे, असे त्या म्हणाल्या.
मदन बामणे यांनी आजपर्यंतचे अनुभव सांगत अवयवदानामुळे अनेकांना कसा लाभ झाला आहे, याची माहिती दिली. समाजातील प्रत्येक घटकाने या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. शिवराज पाटील व संजय पाटील यांनीही आपले विचार व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान अनेक नागरिकांनी अवयवदानाबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवला व भविष्यात अवयवदानासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली. अवयवदान हेच जीवनदान हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचवण्यात आला.
या कार्यक्रमात आय फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, बगीच्या सुधारणा मंच, सुहास्य परिवार सदस्य तसेच फेडरेशन ऑफिसर अपर्णा पाटील, दीपा पाटील, अर्चना कंग्राळकर, शीतल नेसरीकर, वर्दा अंगडी, संजना पाटील व इतर सखी सदस्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर्णा पाटील यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta