बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कडोली येथे 38 वे मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. श्री दूरदुन्डेश्वर मठाच्या आवारातील स्वामी विवेकानंद नगरीत आज साहित्याचा जागर झाला.
सकाळी साडेनऊ वाजता पालखी पूजन करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. ह. भ. प. प्रवीण गणपती मायाण्णा यांनी पालखीचे पूजन केले. अनेक वारकरी मंडळे, भजनी मंडळे, शाळेचे विद्यार्थी, तसेच विविध महापुरुषांचा पेहराव केलेली मुले, या ग्रंथदिंडीत सहभागी झाली होती. यानंतर झालेल्या पहिल्या सत्रात संमेलनाध्यक्ष नितीन सावंत यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कडोली गावातील साहित्य संमेलनाच्या परंपरेचे कौतुक केले. यावेळी त्यांनी संतांची शिकवण, संतांचे साहित्यातील योगदान, संत चळवळ आणि साहित्य याबद्दल आपले विचार मंडळे.
तर दुसर्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन पार पडले. यामध्ये सांगलीचे प्रा. दीपक स्वामी, महेश कराडकर, नाना हलवाई या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. स्नेहभोजनानंतर तिसर्या सत्रात डॉ. संजय कळमकर यांचे माझा मराठाची बोलू कवतुकें या विषयावर व्याख्यान पार पडले. त्यानंतर चौथ्या सत्रात शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर आणि सहकार्यांचा सह्याद्रीचा सिंह गर्जतो हा पोवाड्यांचा कार्यक्रम पार पडला. प्रारंभी यल्लोजीराव तानाजीराव पाटील याची संमेलनाचे उद्घाटन केले. स्वामी विवेकानंद नगरीचे उद्घाटन कुशल कुट्रे यांनी तर सांगाती व्यासपीठाचे उद्घाटन प्रा. एच. के. गावडे यांनी केले तर ग्रंथ दालनाचे उदघाटन मोहन पाटील यांनी केले.
एकंदर आज कडोली गावात साहित्य संमेलनानिमित्त अनेक कवी आणि लेखकांच्या सहभागाने, साहित्य प्रेमींना मेजवानी मिळाली.