Saturday , June 6 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

Spread the love

 

 

बेळगाव : मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे 26 जानेवारी रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या शाळेच्या शिक्षिका सौ. उषा पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पाहुण्यांना इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. पाहुण्यांनी या मानवंदनेचा आदरपूर्वक स्वीकार केला.

शिशू वर्गातून अनुक्रमे प्रांजल नावगेकर, विघ्नेश सांबरेकर, मानवी बेळगुंदकर यांनी आपली मनोगते बोबड्या बोलीत व्यक्त केली. प्राथमिक विभागातून इयत्ता चौथीचा विद्यार्थी सृजन पाटील, माध्यमिक विभागातून मराठीमधून सातवीची विद्यार्थिनी स्वरा पाटील, कन्नडमधून आठवीचा विद्यार्थी प्रसाद मोळेराखी आणि इंग्रजी मधून इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ऋतुजा पाटील यांनी प्रजासत्ताक दिनाबद्दल आपली मते मांडली.

प्रमुख पाहुण्या सौ. उषा पाटील या आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगण्यासाठी संविधान खूप गरजेचे. हक्कांबरोबर कर्तव्य आणि नियम त्यांचे पालन केल्यास व्यक्ती एक आदर्श नागरिक आणि आपला देश एक आदर्श देश बनेल. शालेय जीवनातील आपले ज्ञान दैनंदिन जीवनात वापरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार प्रगल्भ बनवा. प्रत्येक गोष्टीकडे डोळे उघडून बघा… म्हणजे उत्तम नागरिकाची कर्तव्ये आपल्या हातून नक्कीच पार पडतील.

भरतेश शिक्षणसंस्था यांच्या वतीने घेण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले. क्रीडा विभागाने डंबेल्स कवायत, रिंग कवायत, नियमित कवायत, अरेबिक्स कवायत इ. समाविष्ट असणारा एक तासाचा बहारदार कार्यक्रम सादर केला.
सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती माया पाटील यांनी पाहुण्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या सौ.उषा पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.जी.व्ही. सावंत सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. एन. सी. उडकेकर सर, शिक्षण संयोजिका नीला आपटे, बालमंदिर विभागप्रमुख सीमाताई, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती माया पाटील, पालक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकारी शिक्षक श्री. धीरजसिंह राजपूत यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

मराठी विद्यानिकेतनमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

Spread the love  बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये दिनांक ५जून २०२६रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *