Sunday , June 7 2026
Breaking News

सर्वसामान्यांचा विचार करणाऱ्या माणसाला निवडून द्या

Spread the love

 

राष्ट्रवादीचे युवानेते आमदार रोहित पवार यांचे उद्गार

बेळगाव : येणारी निवडणूक मराठी माणसाच्या स्वाभिमानाची आणि निष्ठेची आहे. मराठी माणूस हा स्वाभिमान जपणारा आणि लढवय्या आहे. त्यामुळे निवडणुकीत विजय निश्चित आहे. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी विधिमंडळात आपला लोकप्रतिनिधी लागतो. त्यासाठी सर्वसामान्यांचा विचार करणाऱ्या माणसाला निवडून द्या, असे उद्गार राष्ट्रवादीचे युवानेते आमदार रोहित पवार यांनी काढले. दक्षिण मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारासाठी शिवाजी उद्यान येथील शिवसृष्टीजवळ झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर उमेदवार रमाकांत कोंडुस्कर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, नेताजी जाधव, नगरसेवक रवी साळुंखे आदी उपस्थित होते. यावेळी मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक करताना मराठी माणसावर होणारा अन्याय स्पष्ट केला. आमदार पवार म्हणाले, बेळगावात मराठी माणसाला धीर देण्याबरोबर लढण्यासाठी आलो आहे. येथील तरुणांचा उत्साह पाहिला की विजय निश्चित आहे. शिवाजी महाराजांचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता येथील राजकीय लोक करू लागले आहेत. बेंगळूर येथे शिवाजी महाराजांचा अपमान झाला. त्यानंतर आंदोलन केलेल्या मराठी तरुणांवरच गुन्हा घालण्यात आला. मात्र, कर्नाटक सरकार याबाबत मूग गिळून गप्प बसले होते. येथील सरकार हे कमिशनचे सरकार असून विकास कोणताच झाला नाही. महाराष्ट्रात खोके चालतात आणि इकडे 40 टक्के कमिशन चालते, असा हल्लाबोल देखील रोहित पवार यांनी केला.

रोहित पवारांच्या रोड शो ला प्रतिसाद

दक्षिण मतदारसंघातील म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुस्कर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे युवा नेते आमदार रोहित पवार यांचा रविवारी रोड शो पार पडला. या रोड शो ला नागरिकांचा आणि तरुणांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तरुणांचा बुलंद आवाज आमदार बेळगावात दाखल झाले आहेत. समिती उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी झाले आहेत. विविध ठिकाणी जाहीर सभा, कोपरा सभा आणि रोड शोदेखील घेऊ लागले आहेत. त्यामुळे सीमाभागात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित पवार हे तरुणांचे आवडते व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळे तरुणही मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागले आहेत. वडगाव येथील मंगाई मंदिरपासून या रोड शोला प्रारंभ झाला. त्यानंतर पाटील गल्ली, कारभार गल्ली, पिंपळकट्टा, वडगाव मुख्य रस्ता, बॅ. नाथ पै चौक, शहापूर खडेबाजार, छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमार्गे शिवसृष्टी येथे सांगता झाली. कोंडुस्कर यांना प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना धास्ती निर्माण झाली आहे. दक्षिण मतदारसंघातील मतदारसंघात प्रचारादरम्यान तरुण, महिला आणि नागरिकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. तरुण स्वेच्छेने प्रचारफेरी, जाहीर सभा, रोड शोमध्ये सहभागी होऊ लागले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आदित्यराज संस्थापकावर लूकआऊट नोटीस; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Spread the love  बेळगाव : आदित्यराज कॅपिटल प्रकरणात तपास यंत्रणांनी कारवाईचा वेग वाढवला असून कंपनीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *