बेळगाव : बेळगावमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगावच्या केएलईएस कन्व्हेन्शन हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्य कार्यकारिणी सभेत राज्यातील विविध जिल्ह्यातील एबीव्हीपीचे राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागीय संघटना सचिव, राज्य अध्यक्ष, राज्य सचिव, प्राध्यापक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यासंदर्भात राष्ट्रीय रचिव हर्ष नारायण यांनी संवाद साधला. कोविडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर बेळगावमध्ये राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत प्रामुख्याने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या आचरणासंदर्भात चर्चा करण्यात आली. तिरंगा रॅलीच्या माध्यमातून स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणार्या स्वातंत्र्यवीरांच्या परिचय नागरिकांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून राज्यातील अनेक स्वातंत्र्यवीरांच्या परिचय करून देण्याचे कार्य हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. पुढील वर्षी एबीव्हीपी संघटनेचा अमृत महोत्सव असून या संघटनेचा विस्तार करण्यासंदर्भात तसेच गावातील विद्यार्थ्यांना दिल्लीतील एबीव्हीपीच्या कार्याचा परिचय करून देण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. समाजातील अनेक कार्यात सहभाग नोंदविणे, विविध विद्यापीठातील समस्यांचे निराकरण करणे, शैक्षणिक समस्या आणि सध्या असलेल्या राज्यातील समस्यांसंदर्भात चर्चा करून या सर्व बाबी सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे काम करण्यात येत असल्याचे हर्ष नारायण यांनी सांगितले. या सभेत दक्षिण मध्य क्षेत्रीय सह संघटना सचिव स्वामी मरळापूर, राज्य सचिव प्रतीक माळी, प्रदेश संघटना सचिव मंजुनाथ मिसें, राज्याध्यक्ष डॉ. विरेश बाळीकायी, राज्य सहसचिव ऐश्वर्या आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
