दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी
बेळगाव : कर्नाटक राज्यात जारकीहोळी बंधूंचा राजकारणावर असलेला प्रभाव आज पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. काँग्रेस पक्षात असताना रमेश जारकीहोळी यांच्या राजीनाम्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस सरकार कोसळले होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राज्यात आपली सत्ता स्थापन केली होती. भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेला रमेश जारकीहोळी किंगमेकर ठरले होते. मात्र त्यानंतर झालेल्या कथित अश्लिल सीडी प्रकरणानंतर रमेश जारकीहोळी यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षात रमेश जारकीहोळी यांचे खच्चीकरण होत असल्याची चर्चा होती. याची जाणीव रमेश जारकीहोळी व त्यांच्या समर्थकांना ही चांगलीच झाली होती.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत आपले बंधू लखन जारकीहोळी यांना भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी रमेश जारकीहोळी यांनी केली होती. मात्र त्याकडे पक्षाने दुर्लक्ष केले. त्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान रमेश जारकीहोळी यांनी आपले बंधू,अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांच्यासाठी प्रचार केल्याचेही उघड झाले होते. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या दोन जागांसाठीच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
दरम्यान नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चन्नराज होट्टीहोळी प्रथम तर रमेश जारकीहोळी यांचे बंधू अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. याउलट बेळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे तब्बल बारा आमदार असताना ही पक्षाचे अधिकृत उमेदवार महांतेश कवटगीमठ यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.