Friday , September 13 2024
Breaking News

नेदरलँड येथील तांत्रिक विद्यापीठाकडून आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांना अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट

Spread the love

 

बेळगाव : नेदरलँड येथील तांत्रिक विद्यापीठाकडून आर्किटेक्ट स्नेहल हन्नूरकर यांना अभियांत्रिकीमध्ये डॉक्टरेट बहाल करण्यात आली. बायो बेसड पॅव्हीलियन प्रकल्पाची एकूण संरचना आणि कार्यान्वयन कार्यातील यशाबद्दल त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली.या प्रकल्पासाठी त्यांनी जैविक आणि जैविक आधारित साहित्याचा शोध घेऊन त्याची सखोल रचना, त्यातील नवीनतम डिझाईन आणि त्याच्या बांधणी तंत्राचा सखोल अभ्यास केला आहे. स्नेहल यांना फास मुनेन आणि टॉम विगर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सदर प्रकल्पाची संरचना करून त्याचे प्रदर्शन डच डिझाईन विक मध्ये करण्यात आली होती.
या प्रदर्शनाला हजारो लोकांनी भेट देऊन स्नेहल यांच्या संशोधन आणि प्रकल्पाची प्रशंसा केली.विशेष म्हणजे नेदरलँडच्या महाराणी आणि महा महीम मॅक्झिम यांनी देखील प्रदर्शनाला भेट देऊन स्नेहल यांच्या प्रकल्पाची प्रशंसा केली. स्नेहल हन्नूरकर यांना प्रदान करण्यात आलेली पदवी हन्नूरकर परिवाराच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. स्नेहल या प्रख्यात वकील कै.किसनराव हन्नूरकर आणि निवृत्त मुख्याध्यापिका, लेखिका सुरेखा हन्नूरकर यांच्या कन्या असून डॉ. कपिलदेव हन्नूरकर यांच्या भगिनी आहेत. स्नेहल यांनी आपले यश आजोबा लक्ष्मणराव मुरकुटे आणि आजी सुशीला मुरकुटे यांना समर्पित केले आहे.
स्नेहल यांनी आर्किटेक्ट पुष्कराज करकट यांच्या समवेत चीन मधील शांघाय येथे 2007 मध्ये झालेल्या परिषदेत संशोधन प्रबंध सादर केला आहे. पुणे, बंगलोर आणि बेळगाव येथील अनेक प्रतिष्ठित फर्म मध्ये महत्त्वाच्या प्रकल्पावर काम केले आहे. गोव्यामध्ये त्यांनी पुष्कराज करकट यांच्या समवेत स्टुडिओ थर्टीन आर्किटेक्चर अँड अर्बन डिझाईन ही फर्म सुरू केली आहे. गेल्या सोळा वर्षात स्नेहल यांच्या नेतृत्वाखाली फर्मने अनेक वैशिष्ट्यपूर्ण बंगले, हॉटेल, कॉलेजचे प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण करून विश्वास संपादन केला आहे. गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड आणि तेलंगणा येथे अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत.
भारतात अनेक प्रकल्प राबवत असताना स्नेहल यांनी बांधकामासाठी बायो बेसड साहित्याचा वापर करण्यावर लक्ष केंद्रित केले. बाली येथे त्यांनी बांबूचा वापर करून बांधकाम करण्याचे ज्ञान विकसित केले.त्यामुळे स्नेहल यांना युरोपमध्ये जावून दुसरी मास्टर इन आर्किटेकचर पदवी संपादन करण्यासाठी बांधकामाच्या नव्या पद्धती आणि तंत्रज्ञान याची माहिती घेण्याची प्रेरणा मिळाली. याचाच भाग म्हणून नेदरलँडमध्ये पारंपरिक विंड मिलचा अभ्यास केला. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्नेहल यांनी बायो बेस्ड साहित्याचा वापर करून बांधकाम क्षेत्रात वेगळी नाममुद्रा उमटवली आहे. बायो बेस्ड पॅव्हींलियन या त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर केलेल्या प्रकल्पामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. स्नेहल यांना मिळालेल्या इंजिनियरिंग डॉक्टरेट पदवीमुळे हन्नूरकर आणि करकट परिवाराची मान अभिमानाने उंचावली आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री मळेकरणी सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने रविवारी पुरस्कार वितरण सोहळा!

Spread the love  बेळगाव : श्री मळेकरणी सौहार्द सहकारी संघ नि. उचगाव या सोसायटीच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *