बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत स्थापन करण्यात आलेल्या विविध चेकपोस्टना जिल्हाधिकारी नितेश पाटील व पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी मंगळवारी (दि. २) भेट देऊन पाहणी केली.
यावेळी बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघांतर्गत बाची चेकपोस्ट येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी स्वतः काही वाहनांची तपासणी केली.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, काही चेकपोस्ट आंतरराज्य सीमेला लागून असल्याने कडक दक्षता घ्यावी. बेळगावची सीमा गोवा आणि महाराष्ट्र राज्यांना लागून असल्याने अवैध दारूची तस्करी होण्याची शक्यता जास्त आहे. याशिवाय आदर्श आचारसंहिता लागू असल्याने पैसे व वस्तूंच्या अवैध वाहतुकीवरही लक्ष ठेवले पाहिजे.
पोलीस आयुक्त इडा मार्टिन यांनी पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रत्येक चेकपोस्टवर उपस्थित राहून तपासणी करावी. चेक पोस्टवर तैनात असलेल्या टीमच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र अनिवार्यपणे परिधान करणे आवश्यक आहे; प्रत्येक वाहन तपासणी रजिस्टरमध्ये प्रविष्ट करणे आवश्यक आहे; वाहनाची तपासणी करताना सौजन्याने वागण्याबरोबरच स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.