बेळगाव : 9 मे रोजी पारंपरिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार दिनांक 9 मे रोजी सकाळी सात वाजता शिवज्योतींचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे होणार असून नऊ वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधी व पूजन आरती करून सकाळी दहा वाजता शहापूर शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 11 मे 2024 रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता श्रींच्या पालखीचे पूजन करून नरगुंदकर भावे चौकातून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
शिवजयंती उत्सव महामंडळाची बैठक आज रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी जत्तीमठ देवस्थान येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मरगाळे होते. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक कार्यवाह मदन बामणे यांनी केले तर अहवाल वाचन जनसंपर्क प्रमुख शिवराज पाटील यांनी केले तर अनुमोदन जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी दिले. यावर्षीचा शिवजयंती उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला. बैठकीदरम्यान महादेव पाटील, रणजीत चव्हाण पाटील, विजय पाटील, रणजीत हावळानाचे, विनोद आंबेवाडीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीला रमाकांत कोंडुसकर, सागर पाटील, शिवराज पाटील, राजू मरवे, गणेश दड्डीकर, बाबू कोले, किरण मोदगेकर , अंकूश केसरकर, श्रीकांत कदम आदी उपस्थित होते.