बेळगाव : राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज भाजपवर हल्लाबोल करत आगामी लोकसभा निवडणूक हि काँग्रेसच्या हमी योजना विरुद्ध भाजपचा रिकामा चंबू या धर्तीवर होणार असल्याचे सांगितले.
आज बेळगाव काँग्रेस भवनात आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, मोदी सरकारचा अजेंडा राज्याचा बदला घेण्याचा आहे. मोदी सरकारने कन्नडिगांवर अन्याय केला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या अधिकारावर गदा येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कर्नाटकच्या मातीत पाय ठेवण्याची नैतिकता नाही, अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकारने कर्नाटकच्या पवित्र भूमीला न्याय दिला नाही. राज्य सरकारने सप्टेंबर महिन्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आमच्या मंत्र्यांनी अमित शहा यांची भेट घेतली. कृषी मंत्री, महसूल मंत्री आणि प्रियांक खर्गे यांनी अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन दुष्काळ निवारण निधीसाठी विनंती केली, परंतु आमच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन दुष्काळ निवारणासाठी 18,172 कोटी रुपये देण्याची मागणी केली. मात्र मोदी सरकारने कर्नाटकच्या कराचा पैसाही सोडला नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात निधी देखील देण्यात आला नसल्याचे सुरजेवाला म्हणाले.कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोदी सरकारने प्रतिसाद दिला नाही. दुष्काळ निवारणाच्या पैशासाठी सर्वोच्च न्यायालयाला पायपीट करावी लागली. रस्ते, तलाव, मागासलेल्या भागाच्या विकासासाठी मोदी सरकारने पैसा दिला नाही. त्यामुळे राज्यातील जनतेने भाजपला मतदान का करावे? असा सवाल त्यांनी केला. मोदींना कर्नाटकबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असा आरोप सुरजेवाला यांनी केला. भाजप म्हणजेच भारतीय चंबू पार्टी अशा शब्दात सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर टीका केली. खाली चंबू हे मोदींचे योगदान आहे. भाजपने कर्नाटकला कोरी पाटी दिली आहे. आमचे मतदार ते भाजपला परत देतील, असे ते म्हणाले. काँग्रेस पक्ष कार्यक्रमांच्या आधारे मते मागत आहे. अखंड भारतात कर्नाटक हे एकमेव मॉडेल सरकार आहे. इथे भ्रष्टाचाराला जागा नाही. इथल्या जनतेच्या खात्यात थेट रक्कम जमा होते. यामुळेच इथल्या जनतेने ४० टक्के कमिशनचे सरकार हटवून बसवराज बोम्मई यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचे म्हटले. भाजप घटनाविरोधी असून कर्नाटकातील खासदार अनंत कुमार हेगडे यांनी घटनाच बदलून टाकण्याचे वक्तव्य केले, यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली हुबळी खून प्रकरणाचा काँग्रेसकडून निषेध करण्यात येत असून भाजपकडून याचे राजकारण सुरु असल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला.
या पत्रकार परिषदेला मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार अशोक पट्टण, आमदार राजू सेठ, आमदार लक्ष्मण सवदी यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते.