बेळगाव : सागर शिक्षण महाविद्यालयाच्यावतीने (बी. एड.) नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य राजू हळब यांच्या हस्ते धर्मवीर संभाजी चौकात प्रभातफेरीचे उदघाटन कऱण्यात आले. त्यानंतर किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाझार, शनिवार खुट मार्गे कित्तूर चन्नम्मा चौकात सागर बी.एडच्या प्रशिक्षणार्थींनी फेरीचा समारोप केला.
यावेळी आमचे मत – आमचा अधिकार, चला मतदान करूया – देशाची प्रगती घडवूया, सोडा सारे काम धाम – मतदान करणे पहिले काम, मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो, इच वन – वोट वन, १००% मतदान झालेच पाहिजे आदि अनेक जोरदार घोषणा देत जनजागृती केली.
यावेळी बोलताना भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे म्हणाले, मतदान हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आहे. प्रत्येकाने विचारपूर्वक योग्य उमेदवारास आपले अमूल्य मत दान करून आपले कर्तव्य चोखपणे बजावले पाहिजे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रामाणिक आणि सक्षम उमेदवार निवडून देणे ही काळाची गरज आहे. तरच देशाची सर्वांगिण प्रगती होऊ शकते.
प्राचार्य राजू हळब म्हणाले, प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. प्रत्येकाने येत्या ७ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करावे तसेच इतरांनाही मतदान करण्याबाबत जागृती निर्माण करावी. त्यातूनच बळकट लोकशाही निर्माण होण्यास मदत होते.
यावेळी प्रा. डॉ. तानाजी नौकुडकर, प्रा. कल्पना धामणेकर, प्रा. डी. एम. चव्हाण, प्रा. एम. एस. हिरेमठ, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एन. आय. सनदी, आय. एन. शेख तसेच सर्व प्राध्यापक वर्ग व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.