बेळगाव : सोमवारी रात्री उशीरा हिंदवाडी येथील आयएमईआर जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून आणखी एकजण जखमी झाला आहे. यासंबंधी वाहतूक दक्षिण विभाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरूहोती. निखिल शांतीनाथ पाटील (वय 37 रा. आदर्शनगर-हिंदवाडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे.
निखिल हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी आहे. पल्सरस्वार भावेश जयराम वेर्णेकर (वय 20, रा. सोनार गल्ली वडगाव) हा अपघातात जखमी झाला आहे.
मोटारसायकलवरून आपल्या घरी जाताना वडगावहून आलेल्या मोटारसायकलची धडक बसून ही घटना घडली. या अपघातात दुसऱ्या मोटारसायकलवरील तरुण हा जखमी झाला. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. याची माहिती समजताच वाहतूक दक्षिण विभागाचे निरीक्षक जगदेवप्पा व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री अपघातग्रस्त दुचाकी पोलीस स्थानकात हलविल्या.