साठे प्रबोधनी व्याख्यानमालेत प्रतापसिंह चव्हाण यांचे प्रतिपादन
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातृभाषेतून शिक्षण या विषयावरील व्याख्यान व गुणगौरव समारंभाचे आयोजन मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, प्रमुख वक्ते प्रतापसिंह चव्हाण, मालोजी अष्टेकर, इंद्रजीत मोरे, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत सुभाष ओऊळकर यांनी केले. प्रास्ताविक इंद्रजीत मोरे यांनी केले. यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी भाषेतून पूर्ण केलेल्या व बारावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यामध्ये प्रणव पाटील, सायली तुपारे, संजना पाटील, प्रणय पाटील, विजय देसाई व सौजन्य जत्राटी या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यानंतर श्री. प्रतापसिंह चव्हाण यांनी मातृभाषेतून शिक्षण या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्याने विचारांचा पाया पक्का होतो आपल्याला अभिव्यक्त होता येते. त्याचबरोबर मराठी भाषेची संवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्री. चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी प्रबोधिनीचे सदस्य सुरेश गडकरी, विजय बोंगाळे, प्रा. सुरेश पाटील, नीला आपटे, नारायण उडकेकर, गजानन सावंत इतर सर्व सदस्य, शिक्षक, मराठी प्रेमी नागरिक उपस्थित होते. पाहुण्यांची ओळख गौरी चौगुले यांनी करून दिली, सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले व आभार हर्षदा सुंठणकर यांनी मानले.