बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान राजहंस गल्ली, अनगोळ यांच्यातर्फे श्री सद्गुरु सदानंद महाराज यांच्या 93 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त उद्या बुधवार दि. 5 ते शुक्रवार दि. 7 जून 2024 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री सद्गुरु सदानंद महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त बुधवार दि. 5 जून 2024 रोजी सकाळी ठीक 8 वाजता श्री सद्गुरू सदानंद महाराजांच्या समाधीला अभिषेक करण्यात येईल. त्यानंतर
संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत श्री सद्गुरू सदानंद महाराज यांच्या फोटो व पादुकांचे पूजन करून आरती होईल. तीर्थ प्रसाद वाटपानंतर रात्री 8.30 वाजता लोकसंस्कृती नाट्य कलासंस्था, खानापूर प्रस्तुत अभिषेक कालेकर मराठी लिखित लोक संस्कृतीची ओळख करून देणारा “जागर लोकसंस्कृतीचा” हा कार्यक्रम होईल.
दुसऱ्या दिवशी गुरुवार दि. 6 जून 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता पूजा आरती व तीर्थ प्रसाद होईल. तसेच संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत सामूहिक अभिषेक व पूजा महाआरती होऊन तीर्थप्रसाद वाटप केले जाईल. त्यानंतर रात्री 8 वाजता एस. आर. एस. हिंदुस्थान फिटनेस क्लब या व्यायाम शाळेचा उद्घाटन समारंभ पार पडेल. रात्रीच्या ठीक 10 वाजता भजनाला सुरुवात होईल. तिसऱ्या दिवशी शुक्रवार दि. 7 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता सत्यनारायण पूजा व आरती होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता भजन आणि दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा. महाप्रसादानंतर संध्याकाळी 4 वाजता वारकरी सांप्रदाय यांच्यावतीने हरिपाठ नामस्मरण, पुढे संध्याकाळी 6 वाजता श्री सद्गुरू सदानंद महाराजांच्या पालखी मिरवणुकीला सुरुवात होईल. मिरवणुकीचा मार्ग राजहंस गल्ली, कलमेश्वर मंदिर, करंदीकर गल्ली, श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, लोहार गल्ली, भांदूर गल्ली, रघुनाथ पेठ, धर्मवीर संभाजी चौक व राजहंस गल्ली येथे सांगता असा असणार आहे. प्राप्त कार्यक्रमांना भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.