बेळगाव (वार्ता) : रामदुर्ग नगरपालिकेने पुनर्वसन केलेल्या खोकीधारकांच्या दुकान गाळ्यांचा लिलाव केला जाऊ नये. वाढीव भाडे घ्यावे परंतु त्यांना तेथून हटवू नये, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) रामदुर्ग तालुका समितीने केली आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) रामदुर्ग तालुका समितीच्या शिष्टमंडळाने आज उपरोक्त मागणीचे निवेदन रामदुर्ग नगरपालिकेच्या मुख्य अधिकार्यांसह बेळगाव जिल्हाधिकार्यांना सादर केले. रस्त्यावर व्यापार करणार्या खोकीधारक छोट्या दुकानदारांमुळे रहदारीस अडथळा होण्याबरोबरच अन्य समस्या उद्भवत असल्यामुळे रामदुर्ग नगरपालिकेने या खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 2001 साली खोकीधारकांचे 7 हजार रुपये आणि पालिकेचे 60 हजार रुपये या पद्धतीने निधी संकलित करून त्या खोकीधारकांना दुकानांचे गाळे बांधून देण्यात आले. या पद्धतीने पुनर्वसन झालेल्या संबंधित खोकीधारकांचा त्या दुकानगाळ्यांवर मालकीहक्क असताना आता रामदुर्ग नगरपालिकेवर नव्याने नियुक्त झालेल्या मुख्य अधिकार्यांनी या दुकान गाळ्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या लिलाव प्रक्रियेला संबंधित गाळेधारकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. आपण संबंधित दुकान गाळ्यांचे मालक असल्यामुळे लिलावाद्वारे आपल्याला तेथून हटवू नये. वाटल्यास वाढीव भाडे आकारणी करावी, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी भाकप नेते अॅड. नागेश सातेरी, जी. व्ही. कुलकर्णी, सी. एस. खराडे, जे. एम. जैनेखान यांच्यासह भाकप रामदुर्ग तालुका समितीचे सदस्य उपस्थित होते.
