Sunday , July 26 2026
Breaking News

वीज बिल माफ करण्यासाठी विणकरांचे धरणे आंदोलन

Spread the love

 

बेळगाव : पावसाळी अधिवेशनात यंत्रमागधारक विणकरणाचे वीजबिल माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील विणकरांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला. निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेल्या यंत्रमागधारकांनी थकबाकीचे बिल भरणार नाही, अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
शासनाने विजेच्या दरात वाढ केल्याने विजेवर चालणाऱ्या यंत्रमाग विणकरांचे जगणे असह्य झाले आहे. हेस्कॉमकडून थकीत बिलासाठी आठ ते दहा लाख रुपयांची मागणी केली जात आहे. पण विणकर हे बिल अदा करण्यास असमर्थ आहेत. वस्त्रोद्योगमंत्र्यांनी विणकरांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांना पटवून हा मुद्दा सभागृहात मांडावा. विणकरांचे वीज बिल माफ करावे. कर्जाचा बोजा सहन न झाल्याने राज्यात आतापर्यंत 51 विणकरांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, वस्त्रोद्योग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काहीही केलेले नाही. कर्नाटक विणकर सेवा संघाचे शिवलिंग तिरकी यांनी विणकरांच्या वीज बिल माफीवर सभागृहात चर्चा होईपर्यंत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह करण्याचा इशारा दिला. सरकारला विणकरांच्या समस्यांची चांगलीच जाण असली तरी वीज बिलाच्या वाढीचा बोजा विणकरांवर टाकला जात आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडला आहे. एकीकडे बिल माफ करण्याचे आश्वासन देण्यात येत आहे, तर दुसरीकडे पंधरा दिवसांत बिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला जात आहे. विणकरांचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा पालक मंत्र्यांनी आवाज उठवावा, अशी मागणी विणकर अर्जुन कुंभार यांनी केली.

यावेळी बेळगावसह मानकापूर, नेज ढोणेवाडी, निपाणी, बागलकोट आदी भागातील विणकर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *