बेळगाव : कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली 12 ऑगस्टपासून राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी दिली.
बेळगाव जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघातर्फे बेळगाव शहरातील साहित्य भवन येथे कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस रमेश गोळी म्हणाले की, राज्यातील प्राथमिक सरकारी शाळेतील शिक्षकांची अवस्था बेताची आहे, राज्यातील सुमारे ८० हजार पीएसटी शिक्षक उच्च पदवीधर आहेत, मात्र त्यांना पदोन्नती देण्याऐवजी पदावनती करण्यात येत आहे. त्यामुळे १२ ऑगस्टपासून कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली राज्यातील शिक्षक बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क येथे आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. बेळगाव जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी सांगितले की, कर्नाटक प्राथमिक शिक्षक संघातर्फे आज झालेल्या बैठकीत शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात येत्या ७ ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात देण्यात येणार असून १२ ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथील फ्रिडम पार्क येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.