अतिवृष्टीमुळे नुकसान मदतीसंदर्भात घेतला पहाणी आढावा
बेळगाव : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अतिवृष्टी झाली. तसेच अति पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. याबाबत कृषि विभागाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी. त्याचप्रमाणे पिक विमा काढलेल्या पात्र शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीने 100 टक्के मदत मिळवून द्यावी. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून तेवढाच महत्वाचा आहे, त्यामुळे गांभीर्याने याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके यांनी दिल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या दालनात अतिवृष्टीमुळे नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात आढावा पाहणी आयोजन 25 जुलै रोजी करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना आमदार बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेश्वरी कुलकर्णी, तहसीलदार कुलकर्णी, बेळगाव तलाठी शिंदे, मनपा अभियंते आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीबाधीत भागातील खरीप पिकांची पाहणी केल्यानंतर बेळगाव शहराचे आमदार अनिल बेनके यांनी तात्काळ मदतीबाबत संबंधीत यंत्रणांची पहाणी आढावा फेरी घेतली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा करावा. या मदतीमुळे निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. खरीप पिकांसाठी पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत पीक विमा कंपनी तसेच कृषि विभागाचे कार्यालयाला कळविले आहे, अशा शेतकऱ्यांचा तात्काळ सर्वे करून पंचनामे पूर्ण करावे. त्यांना संबंधीत पिक विमा कंपनीने विम्यापोटी देण्यात येणारी आर्थिक परतावा 100 टक्के द्यावा, अशा सूचनाही शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांनी यावेळी दिल्या. पिक कर्ज वाटपाचा आढावा घेताना अध्यक्ष नारायण सावंत म्हणाले, प्रत्येक बँकेने त्यांचेकडील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत लाभ झालेल्या सर्व शेतकऱ्यांना तात्काळ कर्जवाटप करावे. सर्व पात्र शेतकऱ्यांना संबंधीत व्यापारी / ग्रामीण बँकांनी त्यांचे कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांना तातडीने कर्जवाटप करावे व नियमित अहवाल सादर करावा, असे यावेळी संगितले.
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, तालुकाध्यक्ष सुनील जाधव, सुनील खनुकर, अतुल कडेमणी, सुनील अनगोळकर, महेश बडमंजी, राहुल मोरे, महावीर जक्कणाकर, उत्तम अनगोळकर, सिद्राय मेंडके, निलेश चौगुले, नारायण खांडेकर, विनोद कलकुपी, शीतल दौडणावर यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.