Wednesday , April 22 2026
Breaking News

थकीत बिले तात्काळ अदा न केल्यास मनपा कंत्राटदार जाणार संपावर

Spread the love

 

बेळगाव : कंत्राटदारांची कोट्यावधी रुपयांची बिले मागील वर्ष – दीड वर्षांपासून थकीत असून सदर बिले तात्काळ अदा केली नाही तर येत्या महिन्याभरात आम्ही सर्व कंत्राटदार संपावर जाण्याचा विचार करत आहोत, अशी माहिती बेळगाव जिल्हा कंत्राटदार संघटना आणि महानगरपालिका कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष राजू पद्मनावर यांनी दिली.

महापालिका आयुक्त, उपायुक्त आणि अधीक्षक अभियंत्यांकडे आपल्या थकीत बिलांची मागणी करण्यासाठी तसेच विविध समस्या मांडण्याकरिता आज सकाळी पालिकेचे बहुसंख्य कंत्राटदार महापालिका आवारात जमले होते. या सर्वांच्यावतीने बोलताना कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष राजू पद्मनावर यांनी सांगितले की, आम्ही आज महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना भेटणार होतो. मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून आमची बिले थकीत आहेत. वार्ड बजेटचे पैसेही मिळालेले नाहीत. १५ फायनान्सचे पैसे मागील वर्षी मिळाले नव्हते ते गेल्या आठवड्यात देण्यात आले आहेत. आमचे एएमडी आणि एसडी हे देखील प्रलंबित आहेत. मनपातील योजनेची २५ कोटींची बिले आणि महानगरपालिकेची ५ ते ६ कोटींची बिले थकीत आहेत. सदर बिले तात्काळ अदा केली जावीत अशी अशी आमची मागणी आहे. बिले त्वरित अदा करण्याबरोबरच आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाही तर येत्या महिन्याभरात संपावर जाण्याचा विचार आम्ही करत आहोत. इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकमध्येच कंत्राटदारांच्या बिलांची खूप समस्या आहे. फक्त बेळगाव नव्हे सर्वच महापालिकांमध्ये ही समस्या आहे त्यामुळे थकीत बिले वेळेत अदा केली नाही तर आमची राज्य आणि जिल्हा कंत्राटदार संघटना संप पुकारण्याचा विचार करत आहे, असे अध्यक्ष राजू पद्मनावर यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *